एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील वजन काटा दुरुस्तीला मिळेना मुहुर्त

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारातील वजन काटा गेल्या एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना बाहेरील खाजगी वजन काट्यावर जावे लागत आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात उपलब्ध असलेला केवळ एकच वजन काटा अद्याप दुरुस्त किंवा नवीन वजन काटा उपलब्ध न केल्याने एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील व्यापाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात वजन काटा उपलब्ध करुन देता येत नसेल तर वाहनांना वजन न करता बाजारात प्रवेश द्यावा, अशी मागणी एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील व्यापाऱ्यांकडून होत आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात दररोज शंभर ते दीडशे गाड्यांची आवक होत असते. या वाहनांचे बाजार मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी वजन केले जाते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील वजन काटा बंद आहे. एपीएमसी मार्केट मध्ये तीन वजन काटे होते. मात्र, गेल्या ३० वर्षांपासून दोन वजन काटे बंदच आहेत. केवळ एकाच वजन काट्यावर आतापर्यंत येणाऱ्या गाड्यांचे वजन पेलले जात होते. तसेच एपीएमसी प्रशासन वजन काट्याची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराला पैसे देत असतानाही वजन काटा पूर्ण बंद होईपर्यंत पर्यायी व्यवस्था का केली नाही?, असा प्रश्न एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील व्यापारी उपस्थित करीत आहेत.

एपीएमसी मार्केट मध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांकडून बाजार समिती गेटवर १०० रुपये घेते. मात्र, आता वजन काटा बंद असल्याने बाहेरील वजन काटा धारकांकडून ४०० रुपये आकारले जातात. त्यामुळे लवकरात लवकर वजन काटा उपलब्ध करुन घ्यावा किंवा वाहनांना वजन न करता एपीएमसी मार्केट मध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी एपीएमसी मार्केट मधील व्यापारी करत आहेत.

-----------------------------------------
एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील वजन काटा दुरुस्ती करण्याचा किंवा नवीन वजन काटा घेण्याचा प्रस्ताव एपीएमसी संचालक मंडळ बैठकीत आला असून, येत्या ६ ऑगस्ट रोजी त्या प्रस्तावावर  निर्णय होणार आहे. त्यानंतर वजन काटा बाबत खुली निविदा प्रकिया राबवण्यात येणार आहे. - पी. एल. खंडागळे, सचिव - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, वाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केबीपी कॉलेज तर्फे करावे येथे बियाणे लागवड