कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करु

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसल्याचा आरोप

ठाणे : गेल्या २ वर्षापासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. रस्त्यावर फिरताना महिलांचे जगणे मुश्किल झाले आहे. कावेरी नाखवा, अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे या महिलांचा नाहक बळी गेल्यानंतरही सरकारला अजुन जाग आलेली नाही. एकामागून एक अशा दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. कायद्याचा धाक कोणाला राहिलेला नाही. त्यामुळे गुन्हेगार आपले राजकीय वजन वापरुन पुन्हा मोकाट फिरत आहेत. अशा गुन्हेगारांविरोधातील  खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. जेणेकरुन भविष्यात होणाऱ्या अशा घटनेला आळा बसेल, अशी मागणी ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गट'च्या ‘महिला आघाडी'ने केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करु, असा थेट इशाराच ‘शिवसेना महिला आघाडी'ने दिला. यावेळी महिलांनी ‘युती सरकार'च्या विरोधात काळी फिती लावून संताप व्यक्त करीत हल्लाबोल केला.

याप्रसंगी ‘शिवसेना'च्या महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे, ॲड. आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, ज्योती कदम, छाया अमृगम, अनिता प्रभू, वासंती राऊत, सुप्रिया गायकर, ॲड. आरती खळे, ॲड. पुजा भोसले, भारती गायकवाड, सायली साळवी, वंदना  पवार आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबियांना, गुंडांना संरक्षण देण्यात पोलीस व्यस्त -नंदिनी विचारे

गेल्या २ वर्षात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात सराईत गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. महिला असुरक्षित आहेत. राज्याचे गृहखाते आणि पोलीस यंत्रणा काय करीत आहेत? असा सवाल माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी उपस्थित केला. अपुऱ्या पडणाऱ्या पोलीस मनुष्यबळामुळे पोलीस खाते हतबल झाले आहे. प्रामुख्याने ठाण्यातील पोलिसांचा मनुष्यबळ सत्तेतील राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना आणि गुंडांना सुरक्षा देण्यात व्यस्त असल्याने महिलांचे मंगळसूत्र चोरी, छेडाछेडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबियांकडून आणि गुंडांकडून काढून घेऊन २४ तास रस्त्यावर पोलिसांचे गस्ती पथक वाढविण्याची मागणी यावेळी नंदिनी विचारे यांनी केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे-बेलापूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य