वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
विना परमिट, विना परवाना, विना मीटर व्यवसाय करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी
नवी मुंबई : विना परमिट, विना परवाना, विना मीटर नवी मुंबई कार्यक्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कामगार नेते रविंद्र सावंत यांनी नवी मुंबईतील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये दिघा ते बेलापुरदरम्यान अनेक रिक्षांकडे परमिट नसतानाही त्या धावत आहेत. अनेक चालकांकडे रिक्षा चालकांकडे परवाना नसतानाही ते रिक्षा चालवत आहेत. या प्रकारामुळे ज्या रिक्षांकडे परमिट आहे, ज्या रिक्षा चालकांकडे परवाना आहे, त्यांना व्यवसाय करताना अडचणी येत आहेत, व्यवसाय करताना त्यांचे नुकसान होत आहे. विनापरवाना, विनापरमिट रिक्षा व्यवसाय करत असल्यामुळे प्रामाणिक रिक्षा चालकांवर अन्याय होत आहे. रिक्षा घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाचा हफ्ता, घर चालविणे यावरही फरक पडू लागला आहे. विनापरवाना, विनापरमिट रिक्षांमुळे प्रामाणिक रिक्षा चालकांना रिक्षा चालविणे अवघड होऊन बसले आहे.
त्यातच नवी मुंबईत रस्त्यावर धावणाऱ्या अनेक रिक्षांची दुरावस्था झालेली पहावयास मिळते. त्यामुळे या रिक्षांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिविताला धोका आहे. या रिक्षांची रस्त्यावर धावण्याची पात्रता, क्षमता नसतानाही अडगळीत जाण्याच्या स्थितीत असलेल्या रिक्षा आजही व्यवसाय करत आहे. एकप्रकारे अपघाताला त्या निमंत्रण देत आहेत. समस्येचे गांभीर्य व प्रामाणिक रिक्षाचालकांवर होत असलेल्या अन्याय पाहता नवी मुंबईत धावणाऱ्या रिक्षांचा दर्जा तपासून घ्यावा तसेच चालकांचा परवाना व रिक्षांचे परमिट तपासण्याची व्यापक मोहिम उघडणे आवश्यक असल्याची भूमिका रविंद्र सावंत यांनी शिष्टमंडळासमवेत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे मांडली आहे.
नवी मुंबईतल्या रिक्षा थांब्यावर सदस्य नसलेल्या अन्य रिक्षा व्यवसायासाठी उभ्या राहील्यास सर्वप्रथम त्यांना उभे करत नाही. उभे केल्यास त्यांना स्टॅण्डची पावती तसेच संघटनेची पावती फाडण्यास सांगितले जात असल्याच्या घटनांत व तक्रारीतही वाढ होऊ लागली आहे. बाहेरुन आलेली रिक्षा थोड्या वेळेसाठी व्यवसायासाठी स्टॅण्डवर येते, रांगेत उभे राहिल्यावर ग्राहक घेऊन ते त्यांच्या परिसरात निघून जातात. अशावेळी त्यांना पावतीसाठी, सदस्यत्वासाठी, संघटनेचा सदस्य होण्यासाठी दबाव आणणे योग्य नाही.
रिक्षा चालकांना विना परवाना, विना परमिट धावणाऱ्या रिक्षांचा, बाहेरील स्टॅण्डवर उभे राहिल्यास पावती, संघटनेचा सदस्य अशा प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबईतील दिघा ते बेलापुरदरम्यान रिक्षा तपासणी अभियान राबवून यावर तोडगा काढून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांवर होत असलेला अन्याय दूर करण्याची मागणी सावंत यांनी या बैठकीत केली आहे.
यावेळी युनियन अध्यक्ष रविंद्र सावंत ,संघटना सचिव मंगेश गायकवाड , अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघ विवेक पवार , सचिव .महेश भोसले , उपाध्यक्ष लक्ष्मण साळुंखे , प्रमुख सल्लागार वामन रंगारी, प्रदीप मोहिते , कंत्राटी कामगार अध्यक्ष संजय सुतार, उपाध्यक्ष जाधव , राजू कदम, राजेंद्र जाधव, सुरेंद्र पगारे , सुशांत लम्बे , गणेश शिंदे , विनोद मालुसरे ,व इतर उपस्थित होते.