वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
पाणी साठ्यात डेंग्युुच्या अळ्या; १० सोसायट्या, १५ बांधकाम विकासकांना नोटिसा
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील सोसायट्या आणि इमारत बांधकाम परिसरात साठलेल्या पावसाचे पाण्यामध्ये डेंग्युुच्या अळ्या तयार झाल्याचे आढळून आले आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून अशा १५ बांधकाम विकासकांना कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ज्या बांधकाम क्षेत्रांना आत्ता नोटिसा दिल्या आहेत, त्याठिकाणी पुन्हा डासाच्या अळ्या सापडल्यास संबंधित बांधकाम क्षेत्रे बंद करण्यात येणार असल्याच्या सूचना आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या आहेत. बांधकाम विकासकांबरोबर १० सोसायट्यांना देखील महापालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपल्या सोसायट्या, घरांच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
पावसाळा सुरु झाल्यानंतर मलेरिया, डेंग्यू, लेप्टो यासारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यासाठी महापालिका आरोग्य विभाग आणि किटकनाशक विभागाने मोहिम हाती घेतली आहे. या अंतर्गत मलेरिया, डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील पाणी साचलेल्या ठिकाणाचे सर्वेक्षण केले असता डास उत्पत्ती स्थाने सापडलेल्या १५ बांधकाम विकासकांना आणि १० सोसायट्यांना महापालिव्का तर्फे नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नव्याने बांधकाम सुरु असलेल्या सर्व विकासकांना पावसाचे पाणी, दुषित पाणी साचणार नाही. त्यात डासांच्या आळ्या तयार होणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
घनकचरा-आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सुचनेनुसार किटकनाशक विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. या कृती आराखड्यानुसार सूचना नोटिसा दिलेली बांधकाम स्थळे, भंगार दुकानदार, नारळ विक्रेते, नर्सरी व्यावसायिक, सोसायट्यांनी महापालिकेच्या सुचनांचे पालन केले नाही, संबधित ठिकाणी डेंगू, मलेरियाचे डास, त्यांची अंडी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा सक्त इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पाऊस कमी झाल्यावर साठलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मलेरिया, डेंग्यू डासांची पैदास होत असते. त्यामुळे याविषयी महापालिका तर्फे जनजागृतीपर हॅण्डबीले पत्रके वाटण्यात येत आहे. तसेच ऑगस्ट पासून दवंडी आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.