वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
यशश्री शिंदे हिची हत्या दुदैवी; त्यात राजकारण करु नका
उरण : उरण मधील यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना २७ जुलै रोजी उघडकीस आली आहे. या दुदैवी घटनेने उरण तालुका हादरुन गेला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली. त्याअनुषंगाने ‘विधान परिषद'चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २९ जुलै रोजी उरण मध्ये येेऊन यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
दरम्यान, पोलीस यंत्रणा तपास करत असून आरोपीला कठोर शिक्षा होणार आहे. त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करु नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना उरणकरांना केले आहे.
यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी उरण शहरातील बाजारपेठेत २८जुलै रोजी बंद पाळण्यात आला. तर २९ जुलै रोजी कोप्रोली गाव परिसरात ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. यशश्री शिंदे हत्येच्या घटनेसंदर्भात सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. अशा दुदैवी घटनांना लगाम बसावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून मागणी केली. तसेच शिंदे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आपली उपस्थिती दाखवत आहेत.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार महेश बालदी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तसेच माजी आमदार मनोहर भोईर यांनी ‘विधान परिषद'चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सदर घटनेची माहिती देऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ‘भाजपा'च्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नेते किरीट सोमय्या, आदिंनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा कशा प्रकारे तपास करत आहेत? याची माहिती घेऊन शिंदे कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन आधार देत त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्यासह इतर अधिकारी तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.