‘साहित्य मंदिर'मधील पाऊस गाण्यांना चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : वाशी येथील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या साहित्य मंदिरात २७ जुलै रोजी ‘कवी कुसुमाग्रज वाचनालय, नेरुळ संचलित आणि अ-क्षरकाव्यनिर्मित ‘उत्सव कवितांचा...झिम्मड सरींचा' हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात या तीनही भारतीय जीवनाच्या मुलाधार असलेल्या, वंदनीय असलेल्या महाराष्ट्राचे दैवत पांडुरंग, जगद्‌गुरु व्यास आणि कवी कुलगुरू कालिदास यांच्या स्तवनाने झाली.

 कवी कुसुमाग्रजांच्या दमदार ‘सजल शाम घनगर्जत आले' असं म्हणत, आषाढ सरींना सुरुवात झाली. मग बा सी मर्ढेकर यांच्या नेहमीच्या कवितांपेक्षा वेगळी अशी ‘आला आषाढ श्रावण' या कवितेने अक्षरशः माहोलच बनला. संजय चौधरी, रविचंद्र हडसनकर, आश्लेषा महाजन, ऐश्वर्या पाटेकर अशा वेगवेगळ्या कवींच्या अतिशय अर्थगर्भ कवितांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली.  आरती प्रभू यांची ‘येरे घना येरे घना' कवी, गझलकार आप्पा ठाकूर यांची आणि ‘कालिदासा पुढच्या जन्मी पाऊस व्हायचे मला' या कवितेने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. गीतकार ग दि माडगूळकर आणि संगीतकार आणि स्वर गजानन वाटवे या गजानन द्वयीने गुंफलेल्या ‘फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे' या झुल्यावर बसून आषाढ सरींच्या वर्षावात भिजताना सर्व रसिक जुन्या काळात रममाण झाले. कवयित्री प्रज्ञा लळिंगकर त्यांच्या ‘मी मुक्त मनस्वी माझ्यामध्ये हसले फुलले झुलले' या कवितेने सृष्टीचे आत्ममग्न रूपच रसिकांसमोर उभे केले. येतो येतो म्हणून हुलकावणी देणारा, बेपत्ता होणाऱ्या पावसाचे चित्र साहेबराव ठाणगे यांच्या कवितेतून नेमकेपणाने उतरले. कवी नलेश पाटील यांच्या चित्रदर्शी कवितांवर आधारलेला कवितांच्या भेंड्या हा वेगळा प्रयोग रंगला. कवितांबरोबरच वेगवेगळ्या गाण्यांची झलक दाखवणारा गाण्यांचा मोंटाज, श्रावणात घननिळा, ऋतू हिरवा ऋतू बरवा, कशी अचानक या वेलींवर अशा गाण्यांनी या सर्वच गाण्यांच्या स्मृती चाळवल्या.‘उत्सव कवितांचा...झिम्मड सरींचा' या अ-क्षरकाव्य प्रस्तुत कार्यक्रमात गायिका  सुप्रिया देशपांडे, क्षमा खडतकर, शितल देशपांडे तर निवेदिका म्हणून पल्लवी देशपांडे, प्रज्ञा लळिंगकर सायली डेग्वेकर कलाकारांनी आपापली जबाबदारी लिलया सांभाळली.

 तालवाद्यांसाठी व्यंकटेश कुलकर्णी यांनी  पावसाच्या थेंबांचा उत्तम ठेका पकडला. मराठी साहित्य मंदिर वाशी येथे झालेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या साहित्य मंदिरातबांधलेल्या एका मॅझेनाईन पलोवरचे उद्‌घाटन आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झाले आणि त्यांनीही या कार्यक्रमाचा मनसोक्त आस्वाद घेतला.

 नेरुळ येथील कवी कुसुमाग्रज वाचनालयाचे ललित पाठक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे प्रमोद कर्नाड मराठी साहित्य मंदिरचे सुभाष कुलकर्णी, स्वप्नाताई गावडे, वर्षाताई  भोसले अशा अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 बीसीसीआय कंपनीतील कामगारांना ७ हजार रुपये पगारवाढ