बीएमटीसी कामगार करणार ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषण

पनवेल : १९८४ साली बंद झालेल्या बीएमटीसी कामगारांच्या ३७ वर्षे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर कोणतीही कार्यवाही केली जात नाही, त्यांची विहीत देणी दिली जात नाहीत, तत्कालिन मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांनी दिलेल्या निर्देशांचे सिडको पालन करीत नाही यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या बीएमटीसी कामगारांनी ९ ऑगस्ट रोजी सिडको गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात २८ जुलै रोजी खांदा कॉलनीत बीएमटीसी बस सेवा कर्मचारी पुनर्वसन समितीच्या अध्यक्षा श्रुती श्याम म्हात्रे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यातील काही कामगारांचा मृत्यू झाला आहे; तर काही कामगारांचे वय ६०पेक्षा अधिक आहे.

बीएमटीसी मधील माजी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येकी दहा बाय दहा चौरसफूटांचे भूखंड वितरित करण्याबाबत सिडकोमध्ये ठराव झालेला आहे. या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी लवकरात लवकर सिडकोने करावी अशी मागणी बीएमटीसी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यावेळी कार्यरत असलेल्या १८०० कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी, भविष्य निर्वाह निधी, नुकसान भरपाई व कायदेशीर देणी देणे सिडकोवर बंधनकारक होते. मात्र सिडकोने ही देणी देण्यास नकारात्मक भूमिका घेतली. दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकारची आंदोलने, उपोषणे, धरणे आंदोलन, रास्ता रोको करण्यात आली. २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सिडको प्रशासनाला या कामगाराना अथवा त्यांच्या वारसांना शंभर चौरस फुटांचे व्यावसायिक भूखंड देण्यात यावेत असे सांगितले. त्यानुसार ठराव होऊनही आजपर्यंत या ठरावाची पूर्तता सिडकोने केलेली नाही. कामगारांना हे भूखंड नवी मुंबईच्या कार्यक्षेत्रात मिळावे अशी कामगारांची मागणी आहे. तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी २०२१ मध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे शिष्टमंडळासोबत पार पडलेल्या बैठकीत सदरचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही सिडकोने आजपर्यंत कार्यवाही केली नाही. त्यामुळे सिडको प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कामगारांमध्ये प्रचंड चीड व असंतोष निर्माण झाला असून कामगारांच्या भावना तीव्र बनल्याने  ते सिडको गेटला टाळे लावून कामगार लाक्षणिक उपोषण करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मीटिंग आयोजित करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा; अन्यथा ९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा इशारा कामगारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘साहित्य मंदिर'मधील पाऊस गाण्यांना चांगला प्रतिसाद