शहाबाज मधील ४ मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त

नवी मुंबई : सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसात बेलापूर-शहाबाज गावठाण परिसरातील ४ मजली  इंदिरा निवास इमारत २७ जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोन जखमींवर वाशी येथील नवी मुंबई महापालिका सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 इंदिरा निवास इमारत विनापरवानगी बांधण्यात आली असल्यामुळे या दुर्घटनेस जबाबदार असणारे जागा मालक शरद वाघमारे आणि विकासक महेश कुंभार यांच्या विरोधात एमआरटीपी कायद्याअंतर्गत नवी मुंबई महापालिका मार्फत एनआरआय पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बेलापूर सेवटर-१९ मधील शहाबाज गाव येथील इंदिरा निवास नावाची तळमजला अधिक ४ मजली इमारत २७ जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजता कोसळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई महापालिका अग्निशमन दल जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्याला सुरुवात केली. याशिवाय एनडीआरएफ टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले

इंदिरा निवास इमारतीमध्ये एकूण ३ दुकाने आणि १७ सदनिका आहेत. सदर दुर्घटना घडण्याच्या आधी पहाटे ४ वाजता इंदिरा निवास इमारतीसमोरील रस्त्यावरुन जाणाऱ्या रिक्षा चालकाला इंदिरा निवास इमारतीचे पलास्टर कोसळताना आणि कॉलमला तडे जाताना दिसले. त्यामुळे रिक्षावाल्याने लगेचच इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या मोहम्मद अन्सारी यांचा दरवाजा ठोठावून त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अन्सारी यांनी इमारतीतील रहिवाशांना तत्काळ फोन करुन आणि काहींचे दरवाजे ठोठावून त्यांना बाहेर पडण्यास सांगितले. त्यामुळेच या इमारतीत राहणारे ३७ महिला-पुरुष आणि १३ मुले-मुली दुर्घटना घडण्याच्या आधी सुरक्षितरित्या बाहेर पडले. परंतु, इमारतीतील सर्व रहिवाशी बाहेर पडण्यापूर्वीच इमारत कोसळली. त्यामुळे या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २ जणांचा नाहक बळी गेला आहे. तर दोन जखमींवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सदर घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दल जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तातडीने कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दिसत असलेल्या २ माणसांना बाहेर काढून त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या एनडीआरएफ टीम आणि महापालिका अग्निशमन दल द्वारे ढिगारा उपसण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.  

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी देखील पहाटे घटनास्थळी धाव घेवून सर्व मदत यंत्रणांना सक्रिय केले. पोलीस घटनास्थळी उपस्थित असून, परिस्थिती शांततेत आहे.

दरम्यान, इंदिरा निवास इमारतीतून सुरक्षितरित्या बाहेर पडलेल्या रहिवाशांच्या निवारा आणि जेवण व्यवस्था नवी मुंबई महापालिका निवारा केंद्रात करण्यात आली आहे.

यावर्षी पावसाळ्यातील दुसरी दुर्घटना
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे गत २० जुलै रोजी वाशी सेक्टर-१२ येथील भूखंड क्रमांक-१३३ वर धोकादायक अवस्थेत असलेली चार मजली इमारत कोसळण्याची घटना रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली होती. सदर इमारत धोकादायक जाहीर झाल्याने राहण्यायोग्य नसल्यामुळे त्या इमारतीत राहणारे सर्व रहिवासी इतरत्र राहत होते.  त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर २७ जुलै रोजी शहाबाज परिसरातील इंदिरा निवास नावाची अनधिकृत इमारत कोसळण्याची घटना घडली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गेट वे प्रकल्पातील मुळ सदनिकाधारकांना मे. मेट्रीकॉम रिअल्टी यांच्याकडून कायमस्वरुपी पर्यायी निवास कराराचे वितरण