करंजा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

उरण : उरण-करंजा या मुख्य रहादारीच्या रस्त्याला पावसात सतराशे साठ खड्डे पडले असून रस्ता धोकादायक बनत चालला आहे. त्यामुळे कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री द्रोणागिरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची धुळधाण झाली आहे. त्यामळे चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीने सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तीने हाती घ्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

चाणजे ग्रामपंचायत हद्दीमधील २५ ते ३० हजार नागरिकांना उरण बाजारासाठी तसेच उरण ते अलिबाग जल प्रवाशांसाठी करंजा-उरण या मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहेत. अशा रहदारीच्या रस्त्यावर जीओ कंपनीची केबल टाकण्यासाठी आणि जल जीवन योजना अंतर्गत पाईप लाईन टाकण्याच्या कामासाठी डाऊर नगर, मुळेखंड ते करंजा या ठिकाणावर खोदकाम करण्यात आले आहे. अशा खोदकामामुळे आणि सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून वाहतुकीसाठी रहदारीचा मुख्य रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करंजा ग्रामस्थांनी केली आहे.

चाणजे ग्रुप ग्रामपंचायतकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी, दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध असेल, तर याही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.  -सचिन डाऊर, सामाजिक कार्यकर्ते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मान्सूनपूर्व नालेसफाई योग्य न झाल्यानेच एपीएमसी मसाला बाजार जलमय