कळंबोली मधील अमर रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

पनवेल : महापालिकेच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी कळंबोली मधील डॉ. अर्जुन पोळ यांच्या अमर रुग्णालयावर आयुक्त मंगेश चितळे यांच्या मान्यतेने वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत कडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये अमर रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयाच्या सोनोग्राफी केंद्राची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. याबरोबरच डॉ. अर्जुन पोळ यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाणेमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मावळ तालुक्यात तिहेरी हत्याकांड या मथळ्याखाली वृत्तपत्रामध्ये २३ जुलै २०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या बातमीमध्ये गर्भवती महिला समरिन निसार नेवरेकर वय २५, राहणार वराळे, तालुका मावळ हिला गर्भपात करण्याची तक्रार कळंबोली येथील अमर हॉस्पिटलबद्दल महापालिकेकडे आली होती. वृत्तपत्रातील बातमीनुसार महापालिकेने या रुग्णालयामध्ये चौकशी केली असता रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला; पण ती महिला गर्भवती असल्याचे पुरावे मिळाले नव्हते.

दरम्यान, अमर हॉस्पिटल कळंबोली रुग्णालयात १८ फेब्रुवारी २०२४ रोजी साबरीन अजमल खान, वय २५ वर्षे या गरोदर महिलेचा प्रसुती पश्चात मृत्यू झाला. त्या अनुषंगाने पनवेल महापालिका स्तरावर गठीत करण्यात आलेल्या माता मृत्यू अन्वेषण समितीच्या  बैठकीमध्ये अमर हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा प्रसुती पश्चात मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. या प्रकरणी अमर रुग्णालय व्यवस्थापनाकडून बऱ्याचशा कायदेशीर बाबींची, नियम आणि मानकांची पुर्तता होत नसल्याने या रुग्णालयाने पुढे अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत आंतररुग्ण विभागात नवीन रुग्ण दाखल करुन घेण्यास महापालिकेच्या वतीने लिखित स्वरुपात प्रतिबंध करण्यात आला होता. मुंबई नर्सिंग होम कायद्यानुसार अमर रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबत  चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या समोर १० जुलै २०२४ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. तरी सुध्दा सदर रुग्णालयाने रुग्ण भरती केली होती.

याचवेळी रुग्णालयास कुठल्याही स्वरुपाचे आंतररुग्ण विभागात रुग्ण भरती करुन उपचार करण्यासाठी मज्जाव असताना सुध्दा अशा स्वरुपाचा अवैध पध्दतीने गर्भपात करण्यासारखा गंभीर गुन्हा हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून झालेला आहे अशी वृत्तपत्रातील बातमी निदर्शनास आली. या प्रकरणातील सर्व तथ्ये आणि सत्याची पडताळणी केल्यानंतर तसेच पूर्वीच्या अनेक तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाच्या आदेशाची अवहेलना केल्यामुळे महापालिकेने अमर रुग्णालयावर तातडीने कडक कारवाई केली आहे. यामध्ये रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. याबरोबरच रुग्णालयाच्या सोनोग्राफी केंद्राची नोंदणी देखील रद्द करण्यात आली आहे. तसेच अमर रुग्णालयाचे संचालक डॉ. अर्जुन पोळ यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाणे मध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी  महापालिकेने कार्यवाही सुरु केली आहे.

दरम्यान, अमर रुग्णालयाचे संचालक डॉ. अर्जुन पोळ यांचा व्यवसाय परवाना रद्द करण्याबाबत महाराष्ट्र वैद्यकिय परिषद (महाराष्ट मेडिकल कौन्सील) यांच्याकडे पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

करंजा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य