वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
अतिवृष्टीतही नवी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात
नवी मुंबई : नवी मुंबई महारपालिका क्षेत्रात २४ जुलै रात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून २४ जुलै रोजी सकाळी ८.३० ते २६ जुलै सकाळी ८.३० पर्यंत ४८ तासात सरासरी १६५.४८ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. त्यामध्ये २५ जुलै सकाळी ८.३० ते २६ जुलै सकाळी ८.३० या एकाच दिवसात सरासरी ९८.०५ मि.मी. इतक्या मोठया प्रमाणात पर्जन्यवृष्टी झालेली आहे. नवी मुंबईत अतिवृष्टी होऊनही महापालिकेची मदत यंत्रणा सर्व क्षेत्रात दक्षतेने तैनात असल्याने शेजारच्या शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात होती. शिवाय महापालिकेच्या स्वच्छता, आरोग्यासह सर्व सेवाही कार्यान्वित होत्या.
पावसाची संततधार स्थिती पाहून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे रात्रीपासूनच सर्व संबंधितांच्या संपर्कात होते. आपत्ती नियंत्रण कक्षातून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्तांसह विभागप्रमुख आणि सर्व विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त अधिनस्त कर्मचाऱ्यांसह मदत कार्यासाठी सज्ज होते. स्वच्छता कर्मचारी पावसात स्वच्छतेची कामे करीत होते. घंटागाड्यांमार्फत कचराही वेळेत उचलण्यात आला. त्यामुळे शहरातील स्वच्छता नेहमीसारखी राहिली. आरोग्य यंत्रणाही नागरी आरोग्य केंद्रापासून रुग्णालयापर्यंत सर्वच स्तरांवर दक्षतेने कार्यान्वित होती. ज्या ठिकाणी वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्याची माहिती मिळाली, त्या ठिकाणचे अडथळे दूर करुन पावसाळी पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करुन देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त आदेशानुसार पावसाची स्थिती बघता नमुंमपा क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. जे विद्यार्थी सकाळच्या सत्रात शाळेत आले होते, ते सुरक्षितपणे घरी पोहोचतील याची दक्षता घेण्याचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना निर्देशित करण्यात आले. दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने रात्री जाहीर केल्याप्रमाणे २६ जुलै रोजीही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
नमुंमपाच्या वतीने २५-२६ जुलै रोजी सकाळीच विविध माध्यमांतून अतिवृष्टीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले होते. तसेच महापालिकेच्या सर्व यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेशित करण्यात आले. त्यानुसार सर्व यंत्रणा महापालिका क्षेत्रामध्ये विविध विभागात मदतकार्यासाठी कार्यरत होती. यामुळे जोरदार पाऊस पडूनही नवी मुंबई शहरातील परिस्थिती नियंत्रणात राहिली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान, २१ जुलै रोजीच्या मुसळधार पावसानंतर महापालिकेमार्फत पाणी साचलेल्या विविध स्थळांची पाहणी करुन पाणी साचण्याची कारणे जाणून घ्ोण्याचा बारकाईने प्रयत्न करण्यात आला. याकरिता त्या स्थळांच्या आसपासच्या नाल्यांची पाहणी करण्यात आली तसेच तेथील स्थानिक नागरिकांशीही संवाद साधण्यात आला.
नमुंमपाची संपूर्ण यंत्रणा पावसाळी कालावधीतील मदत कार्यासाठी सज्ज आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. महापालिकेच्या अधिकृत समाज माध्यमांद्वारे अतिवृष्टी आणि इतर महत्वाचे संदेश वेळोवेळी जारी करण्यात येत असतात, अशा संदेशांमधील सुचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.