वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
उल्हास नदी पुराचा रायते पुलाला फटका
कल्याणः कल्याण-अहमदनगर मार्गावरील उल्हास नदीवरील रायते पुल २५ जुलै रोजी नदीतील महापुरामुळे दिवसभर पाण्याखाली होता. यामुळे या पुलाची आणि पुलावरील रस्त्याची पुरती दुरावस्था झाली आहे.
२६ जुलै रोजी पूर ओसरताच संबंधित विभागाकडून पुलाची पाहणी करण्यात आली असता पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर तडे जाऊन रस्त्याचा भाग खचला असल्याचे दिसून आले. तसेच पुलाला जोडणारा रस्ता आणि पुलाचे लोखंडी कठडे वाहून गेले. मात्र, राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ला जोडणाऱ्या या पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.
या महामार्गावरील वाहतूक बंद असून २६ जुलै रोजी कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडून या पुलाची पाहणी करण्यात आली. सदर पुल ब्रिटीश कालीन आर्च पध्दतीने उभारलेला कमी उंचीचा असून प्राथमिक पाहणीत सदर पुल सुरक्षित असल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही ड्रोनद्वारे पुलाची सर्व बाजुने तपासणी करुन पुल सुरक्षित असल्याची खात्री करुनच तो वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार असल्याचे तहसीलदार शेजाळ यांनी सांगितले.