वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
सागरी प्रवासी वाहतुक ठप्प
उरण : नऊ दिवसानंतरही धोक्याचा इशारा देण्यात येणारा तीन नंबर बावटा कायम असल्याने गेटवे ऑफ इंडिया-एलिफंटा, गेटवे ऑफ इंडिया-जेएनपीए , मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक अद्यापही बंदच आहे. यामुळे लाँच चालक, शेकडो व्यावसायिकांना रोजी-रोटीला मुकावे लागले आहे.
१८ जुलै पासून खराब हवामान, वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका आणि लावण्यात आलेला धोक्याचा इशारा देणारा तीन नंबर बावटा यामुळे जेएनपीए-भाऊचा धक्का, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या सागरी प्रवासी वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.गेटवे ऑफ इंडिया येथून पावसाळी हंगामात दररोज ७-८ तर रविवार, सुट्टीच्या दिवशी २०-२५ लाँचेस सुमारे १००० ते १५०० पर्यटकांना घेऊन एलिफंटा लेणी पाहण्यासाठी जातात. ३० मिनिटांच्या समुद्र सफरीचा आनंद लुटण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथुनच हार्बरसाठी दररोज २५०० ते ३००० पर्यटक येतात. मात्र, सर्वच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबर बावटा लावण्यात आल्याने गेटवे ऑफ इंडिया येथून दररोज होणारी पर्यटन वाहतूक १८ जुलै पासूनच पुरती ठप्प झाली आहे.बंदरात आदळणाऱ्या आणि उसळणाऱ्या उंचच उंच लाटा, फेसाळलेला समुद्र यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान सागरी वाहतूक केव्हाही अनियमित कालावधीसाठी बंद करण्यात येत असते. त्यामुळे एलिफंटा बेटावर पावसाळ्यातही जाणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटकांवर माघारी परतण्याची वेळ येते. एलिफंटा बेटावरही एकाही पर्यटकाला लेणी पाहण्यासाठी जाता येत नाही.यामुळे लाँच मालकांना दररोज लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे, अशी माहिती ‘गेटवे ऑफ इंडिया-एलिफंटा जलवाहतूक संस्था'चे अध्यक्ष इक्बाल मुकादम यांनी दिली. समुद्रात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबर बावटा जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत सागरी प्रवासी वाहतूक बंद राहील, अशी प्रतिक्रिया गेटवे ऑफ इंडिया- मुंबई बंदर निरिक्षक गुंजन यांनी दिली.
पर्यटकांअभावी व्यवसायही मागील नऊ दिवसांपासून ठप्प झाला आहे. यामुळे बेटावरील पर्यटक आधारित व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट आले आहे, असे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
भाऊचा धक्का ते मोरा या सागरी मार्गावरुनही १८ जुलै रोजी संध्याकाळपासूनच प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने घेतला आहे. यामुळे भाऊचा धक्का ते मोरा आणि जेएनपीए सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक गेल्या ९ दिवसांपासून कोलमडली आहे, अशी माहिती ‘मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्था'चे पदाधिकारी अनिल परब यांनी दिली.
रेवस-करंजा सागरी मार्गही बंद असल्याने जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या सागरी मार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे दोन हजार प्रवासी आणिकामगारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे.बोटी बंद असल्याने प्रवासी आणि कामगारांवर रेल्वे, एसटी, खासगी वाहनाने कामाच्या ठिकाणी पोहोचण्याची वेळ आली आहे.
वादळी, खराब हवामानामुळे स्थानिक मासेमारीवरही गंडांतर आले आहे. त्यामुळे स्थानिक मासळी बाजारात मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्यातरी हजारो प्रवासी आणि पर्यटकांना धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा उतरुन सागरी मार्ग पुर्ववत सुरु होण्याची प्रतीक्षा जलमार्गाने प्रवास करणारे पर्यटक, प्रवाशी करीत आहेत.