वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
आपत्ती वेळी आपदा मित्र-सखींनी कसली कंबर
कल्याण : २५ जुलै रोजी पूर परिस्थितीत आपदा मित्र-सखी यांनी अग्निशमन दलासोबत सोबत उपस्थित राहून गोविंदवाडी परिसरात खाडीकिनारी असलेल्या लोकवस्ती आणि इमारती मधून ५० नागरिकांचे जीव वाचविले. तसेच गोठ्यातील म्हशींची सुटका करुन त्यांना त्यांच्या मालकांच्या ताब्यात दिले.
आपत्कालीन परिस्थितीवेळी तातडीची मदत म्हणून तहसिल कार्यालय आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरक्षित असलेल्या शाळा, खाजगी जागा यांसोबत सर्व साधनसामुग्री आणि अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन दिल्या होत्या. पूर येणाऱ्या संभाव्य ठिकाणी वारंवार सुचना सुध्दा देण्यात आल्या. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, जनावरांना मुक्त करावे, काय उपाययोजना कराव्यात, स्वतःची काळजी कशी घ्यावी यासह इतर घोषणा-विनंती यावेळी करण्यात केल्या. पण, सालाबादप्रमाणे संबंधित ठिकाणच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले नाही आणि साध्या मुक्या जनावरांना सुध्दा मुक्त केले नाही.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे जीव धोक्यात घालून अग्निशमन दल, आपदा मित्र- सखी यांनी नागरिकांचा जीव वाचवला आणि मुक्या जनावरांना सुरक्षित बाहेर काढून त्यांना त्यांच्या मालकांच्या ताब्यात दिले. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आपदा मित्र प्रशिक्षण घेतलेले पोलिस पाटील यांनी नागरिकांना रस्त्यातील गटार चुकवत पाण्यातील मार्ग दाखवला. सोबत नागरिकांना आवश्यक पाण्याची बॉटल, जेवण पुरवले. काही आपदा मित्र सखी डोंबिवली आणि टिटवाळा अग्निशमन दलासोबत मदतकार्यात सहभागी होते तर काही स्थानिक पातळीवर कार्यरत होते.
ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक रचना आणि पूर्वानुभव घेता वर्षभरात पडणारा पाऊस, नैसर्गिक-मानवनिर्मित आपत्ती म्हणजे आग लागणे, पूर-भूकंप येणे, इमारत-दरड कोसळणे यासारख्या दुर्घटनांवेळी तत्काळ उपाय म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जावंजाळ आणि इतर टीम यांनी संबंधित तहसिल कार्यालयाच्या साथीने संपूर्ण जिल्हात ५०० आपदा मित्र सखी यांना तज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले. यासोबत त्यांना आवश्यक किट, जीवन सुरक्षा विमा कवच दिले आहे.
या आपदा मित्र सखींमध्ये प्रामुख्याने कॉलेज युवक-युवती, नागरी संरक्षण दल, पोलीस पाटील, वन विभाग कर्मचारी, खाजगी अग्निशमन कर्मचारी, सामजिक संस्था यांचा सहभाग आहे. काही ठिकाणी तहसील कार्यालयात बोट, इन्फटेबल टेन्ट आणि इतर महत्वाचे साहित्य देण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यात सर्व आपत्ती यंत्रणांचे वेळोवेळी सराव शिबिर सुरु असते.
दरम्यान, सदर सर्व आपत्कालीन परिस्थितीवर तहसील कार्यालय आणि महापालिका आयुक्त सीसीटिव्ही कंट्रोल रुम मार्फत लक्ष ठेवून होते. तसेच फोनद्वारे माहिती घेऊन सूचना देत असल्याची माहिती आपदा मित्र समन्वयक सुहास पवार यांनी दिली.