वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
कल्याण-डोंबिवली शहरात पावसाचा हाहाकार
कल्याण : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली शहराला चांगलाच तडाखा दिला असून शहरात पावसामुळे खाडी किनारी पाण्याची पातळी वाढल्याने तसेच सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
कल्याण-डोंबिवली शहरातील नदी, खाडी किनारी तसेच गणेश घाट, नजिकच्या आणि सखल भाग आदि ३१ ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. तर सुमारे २४६ घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने ६४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. गेल्या २४ तासात कल्याण तालुवयामध्ये १८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर २५ जुलै रोजी सकाळी ६पासून दुपारी ४ वाजे पर्यात १०९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याण-डोंबिवली शहराला गेल्या २ दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. पावसाने २४ जुलै रोजी रात्री पासून चांगलाच जोर धरल्याने कल्याण पश्चिम मधील भागातील खाडीकिनारी असलेल्या भागांना पावसाचा तडाखा पडला. कल्याण खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने खाडीचे पाणी लागत असलेल्या गोविंद वाडी, रेतीबंदर परिसरातील चाळी मधील घरामध्ये शिरल्याने या घरातील नागरिकांना त्वरित स्थानिक रहिवाशांनी इतरत्र हलविले. गोविंद वाडी परिसरातील तबेल्या मध्ये देखील खाडीचे पाणी शिरल्याने तबेल्यातील म्हशींना गोविंद वाडी दुर्गाडी रस्त्यातील दुभाजकावर बांधून ठेवण्यात आले. काळू आणि उल्हास नदीने पाण्याची पातळी ओलांडल्याने या दोन्ही नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
कल्याण स्टेशन परिसर, बाजारपेठ, आंबेडकर रोड, शहाड, आडीवली ढोकली तसेच खाडीकिनारी असलेले अशोक नगर, वालधुनी, योगिधाम, घोलप नगर, खडेगोळवली, डोंबिवलीतील पलावा, कोपर गांव, आयरे गांव, गरीबाचा पाडा, राजीव नगर, कुंभारखान पाडा, आदि सुमारे ३१ ठिकाणीच्या किनारी असलेल्या २४६ घरामध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने या घरातील ६४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालांतरीत करून सुमारे ६५० नागरिकांना फुड पाकीट वाटल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. तर शहरात अन्य १९ ठिकाणी पाणी साचल्याची तर आधारवाडी येथे झाड पडल्याची तक्रार महापालिका आपत्कालीन विभागाकडे नोंद करण्यात आली होती.
टिटवाळा मध्ये देखील सखल भागात पाणी साचल्याने चाळीच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरले. टिटवाळा येथील जावईचा पाडा, भालचंद्र नगर, बंदरपाडा, मोहने यादव नगर, आदि सखल ठिकाणी देखील पाणी साचले होते.
सिटी पार्क बुडाले...
करोडो रुपये खर्च करुन ‘स्मार्ट सिटी'च्या माध्यमातून योगदान परिसरात उभारलेल्या ‘सिटी पार्क'ला पुन्हा एकदा पुराचा तडाखा बसला आहे. संपूर्ण सिटी पार्क पाण्याखाली गेल्याने कल्याणमधील विरंगुळ्यासाठी असलेले एकमेव सुंदर उद्यान केवळ ६ महिन्यात बेरंग झाले आहे.
मोहिली जलशुद्धीकरण पाण्याखाली गेल्याने पाणीपुरवठा बंद
‘केडीएमसी'ने करोडो रुपये खर्च करुन जेएनएनयुआरएम योजनेतून मोहिली उंदचन केंद्र बांधले. कन्सलटन्ट कंपनीने सल्ला देण्याचे लाखो रुपये घेतले. पंरतु, २ ते ३ दिवसाच्या धुवाँधार पावसात उल्हासनदी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यावर मोहिली उंदचन
केंद्रात पुराचे पाणी शिरुन पाणी पुरावठा यंत्रेणेवर परिणाम झाला. आतापर्यंत ५ ते ६ वेळा मोहिली उदचंन केंद्र पुराच्या पाण्याखाली गेले. यानिमित्ताने पाणी उचलण्याची पंपिंग यंत्रणा समोरील उंच ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात आली आहे.
२५ जुलै रोजी मोहिली जलशुध्दीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे जलशुध्दीकरण केंद्र बंद करण्यात आले. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर जलशुध्दीकरण केंद्र चालू करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. त्यामुळे अ प्रभागातील मांडा, टिटवाळा, उंबरणी, बल्याणी, आटाळी, आंबिवली, मोहने, वडवली आणि कल्याण पश्चिमेकडील काही भागतील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका तर्फे देण्यात आली आहे.