‘महिला आयोग'च्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली अक्षता म्हात्रेच्या कुटुंबियांची भेट

नवी मुंबई : शीळ मधील श्री गणेश मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या बेलापूर मधील अक्षता म्हात्रे या विवाहितेवर सामुहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची घटना ६ जुलै रोजी घडली असून या प्रकरणात दोघा तिघा पुजाऱ्यांसह तिघा जणांना डायघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अक्षता म्हात्रे बलात्कार-अत्याचार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा होईल यासाठी ‘राज्य महिला आयोग'कडून पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही ‘आयोग'च्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नवी मुंबईत दिली.

‘राज्य महिला आयोग'च्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी २५ जुलै रोजी मयत अक्षता म्हात्रे हिच्या कोपरखैरणे येथील घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अक्षता म्हात्रे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ‘राज्य महिला आयोग'ने याची दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करुन ‘आयोग'ला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरचा तपास, आरोपींची अटक याची माहिती आपण वेळोवेळी घेतल्याचे चाकणकर यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबईतील भेटीवेळी रुपाली चाकणकर यांनी मयत अक्षता म्हात्रे हिची आई-वडील, बहीण यांच्याकडून अक्षताला सासरी झालेल्या त्रासाची माहिती जाणून घेतली.

दुसरीकडे अक्षता म्हात्रे प्रकरणी सुरु असलेल्या तपासाची योग्य माहिती कुटुंबियांना द्यावी. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी लवकर जादा शिक्षेची कलमे लावून चार्जशिट दाखल करण्याची सूचना आपण पोलिसांना दिली असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. याशिवाय सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षाच व्हावी यासाठी ‘राज्य महिला आयोग' पाठपुरावा करेल, असेही त्या म्हणाल्या.

याप्रसंगी ‘राष्ट्रवादी-अजित पवार गट'चे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, महिला पदाधिकारी सुनिता देशमुख, डायघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याण-डोंबिवली शहरात पावसाचा हाहाकार