एपीएमसी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला मंजुरी

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मधील अधिकारी-कर्मचारी यांच्या पदोन्नतीला एपीएमसी संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.

एपीएमसी मधील अधिकारी-कर्मचारी यांची पदोन्नती मागील ४ वर्षांपासून रखडली होतो. याबाबत पाठपुरावा करुन देखील ठोस पाऊले उचलली न गेल्याने अखेर २३ जुलै रोजी एपीएमसी संचालक मंडळाची बैठक सुरु असतानाच पदोन्नती पासून वंचित असलेल्या एपीएमसी अधिकारी-कर्मचारी यांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत अखेर एपीएमसी संचालक मंडळाने एपीएमसी अधिकारी-कर्मचारी यांच्या पदोनत्तीला मंजुरी दिली.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीतील अनुकंपाधारक आणि अधिकारी- कर्मचारी यांच्या रखडलेल्या पदोन्नतीमुळे मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीत २३ जुलै एपीएमसी संचालक मंडळाची  बैठक सुरु असताना सभागृहाबाहेर ३६ अनुकंपाधारक आणि ७४ अधिकारी- कर्मचारी यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी एका संचालकाला घेराव घालून मागण्यांचा पाढा एपीएमसी अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून वाचण्यात आला.  एकूण  सहा वेळा बैठक घेऊन देखील पदोन्नती न दिल्याने नाराज असलेल्या अनुकंपा धारक आणि  अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी भाजीपाला मार्केट आणि प्रशासकीय इमारतीचे कामकाज सोडून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर एपीएमसी संचालक आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात पदोन्नती पासून वंचित असलेल्या एपीएमसी अधिकारी-कर्मचारी यांची बाजू मांडल्यानंतर संचालक मंडळाने पदोन्नती पासून वंचित असलेल्या एपीएमसी अधिकारी-कर्मचारी यांना पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाला  मंजुरी  दिली. तसेच अनुकंपाधारकांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी देण्यावर कार्यवाही करण्याचे सूचित केले.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांच्या पदोन्नती प्रस्तावास एपीएमसी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावावर आता अधिकारी-कर्मचारी यांच्या पदोन्नती देण्याबाबत पुढील कार्यवाही पार पाडली जाणार आहे. - पी. एल. खंडांगळे, सचिव - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), वाशी.
------------------------------------------
२३ जुलै रोजी एपीएमसी संचालक मंडळाची बैठक सुरु असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीची मागणी केली. या मागणीस एपीएमसी संचालक मंडळाने मंजुरी दिली असून, एपीएमसी अधिकारी-कर्मचारी यांना पदोन्नती देण्याची पुढील कार्यवाही एपीएमसी प्रशासन करणार आहे. - अशोकराव डक, काळजीवाहू सभापती - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), वाशी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘महिला आयोग'च्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली अक्षता म्हात्रेच्या कुटुंबियांची भेट