एपीएमसी फळ बाजारात सीताफळ दाखल होण्यास सुरुवात

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) घाऊक  फळ बाजारात जुलै महिन्यात सीताफळ दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र, सीताफळ  उत्पादन घेत असलेल्या भागात अजूनही मुबलक पाऊस  पडत नसल्याने उत्पादन कमी होत आहे. एपीएमसी फळ बाजारात सध्या एक-दोन गाड्या सीताफळ दाखल होत असून, सीताफळ आकाराने लहान आहे. सध्या सीताफळ ४० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.

सीताफळ महाराष्ट्र राज्यातील पुणे आणि नगर जिल्ह्यातून  एपीएमसी फळ बाजारात दाखल होत असते. मात्र, पुणे, नगर या भागात तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे सीताफळ पिकावर परिणाम होत आहे. एपीएमसी फळ बाजारात सध्या एक-दोन गाड्या सीताफळ दाखल होत असून, २४ जुलै रोजी २०२ क्विंटल सीताफळ दाखल झाली. सीताफळ उत्पादन घेत असलेल्या भागात सध्या पुरेसा पाऊस नसल्याने सीताफळाची वाढ होत नसून, आकाराने छोटे सीताफळ आहेत. सीताफळ वाढ होण्यासाठी पावसाची गरज आहे. पावसाच्या नैसर्गिक पाण्याने सीताफळाची वाढ अधिक चांगली होते, असे मत फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

सीताफळ परिपक्व होण्यासाठी चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी जातो. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पीकाला पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. परिणामी सीताफळ पीक उत्पादन घेण्यास विलंब होतो. सध्या बाजारात सीताफळ ४० ते१०० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत.एपीएमसी फळ बाजारात जुलै अखेर  सीताफळाची आवक होत असून, ऑगस्ट महिन्यामध्ये अधिक प्रमाणात सीताफळ दाखल होण्यास सुरुवात होते. त्यानंतर बाजारात सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत सिताफळाचा हंगाम असतो. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 एपीएमसी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीला मंजुरी