वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनासाठी ‘ठाणे'मध्ये १२७ मदत कक्ष स्थापन
ठाणे : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची कार्यवाही ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सुरु असून या योजनेसाठी एकूण १२७ मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्व प्रभागसमिती स्तरावरील सहाय्यक आयुक्तांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यासह पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील तिच्या निर्णायक भूमिकेच्या बळकटीकरणासाठी राज्यशासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना कार्यान्वित करण्यात केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील या योजनेच्या अंमलबजावणीचा प्रभाग समितीनिहाय आढावा सदर बैठकीत आयुक्त राव यांनी घेतला.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी लाभ घेवू इच्छिणाऱ्या महिलांची संख्या जास्तीत जास्त होईल, या दृष्टीकोनातून प्रभाग समितीस्तरावर नियोजन करुन कार्यवाही करावी. तसेच लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्यासाठी ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्याबाबतही कार्यवाही व्हावी. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही बैठकीत आयुक्तांनी दिल्या. तसेच प्रभाग समिती क्षेत्रातंर्गत येत असलेल्या औद्योगिक क्षेत्र, झोपडपट्टी विभाग आदि ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देवून लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशाही सूचना सदर बैठकीत करण्यात आल्या.
सदर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीचा वापर करावा. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेवून त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाचा दैनंदिन आकडा देखील उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिल्या.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समित्यांमध्ये मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा यासाठी शहरात व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत असून या योजनेच्या लाभार्थी महिलांपर्यत पोहोचण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, बचत गटाच्या माध्यमातून काम करुन घेण्याची जबाबदारी प्रत्येकांची असल्याचेही आयुक्त रा यांनी नमूद केले.
सदर योजनेची माहिती जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यत पोहोचाविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शहरात फलकांच्या माध्यमातून योजनेसाठी लागणारे कागदपत्र तसेच अटी-शर्थींची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील घंटागाड्यांच्या माध्यमातून जिंगल्स लावण्यात आले असल्याचे आयुवत राव यांनी नमूद केले. तसेच महापालिका कार्यक्षेत्रात एकूण १२७ मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एकही पात्र महिला योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी प्रभाग समितीस्तरावरील सहाय्यक आयुक्तांनी विशेष प्रयत्न करावेत, असेही या बैठकीत नमूद करण्यात आले.
सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, तुषार पवार, मनिष जोशी, शंकर पाटोळे, दिनेश तायडे तसेच सर्व प्रभाग समित्यांचे सहायक आयुक्त उपस्थित होते.