वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनाः लाभ घेण्यासाठी महिलांमध्ये उत्साह
नवी मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेला नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महिला उत्साही प्रतिसाद देत असल्याचे दिसत असून महापालिकेच्या वतीने समुह संघटक, आशा वर्कर मोठया प्रमाणात महिलांची भेट घेऊन त्यांना या योजनेची माहिती देत आहेत. तसेच त्यांचे अर्जही भरुन घेतले जात आहेत. महिला-बालविकास विभागाच्या नारीशक्ती दूत ॲपद्वारे प्राधान्याने ऑनलाईन अर्ज दाखल करुन घेतले जात असून ऑफलाईन अर्जही लेखी भरुन घेतले जात आहेत.
नमुंमपा क्षेत्रातील एकही पात्र महिला लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची काळजी घेऊन गतिमान कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले असून त्यानुसार जास्तीत जास्त महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवून त्यांचे अर्ज भरुन घेतले जात आहेत. याकामी महिला बचत गटांचीही मदत घेतली जात असून समाज विकास विभागाचे समुह संघटक महिला बचत गटांपर्यंत पोहोचून त्यातील पात्र महिलांचे अर्ज भरुन घेत आहेत. तसेच त्या महिलांमार्फतही इतर महिलांपर्यंत पोहोचून योजनेच्या माहितीचे प्रसारण केले जात आहे. याशिवाय आरोग्य विभागातील आशा वर्कर आपापल्या क्षेत्रातील घरांपर्यंत जाऊन पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
योजनेचे अर्ज भरण्यात महिलांना कोणतीही अडचण येऊ नये यादृष्टीने महापालिका मुख्यालय तसेच ८ विभाग कार्यालय क्षेत्रातील १११ प्रभागांमध्ये ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून तेथे महिलांचा उत्साही प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यासोबतच शासनाच्या महिला-बालविकास विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या २२६ अंगणवाड्यांमध्येही अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु आहे. अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून आत्तापर्यंत २२ हजारहून अधिक महिलांनी अर्ज दाखल केले असून ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.
दरम्यान, योजनेचे अर्ज पात्र महिला स्वतः नारीशक्ती दूत ॲप, पोर्टल वरुन भरु शकतात अथवा नवी मुंबई महापालिकेने स्थापित केलेल्या नजिकच्या मदत कक्षात अथवा अंगणवाडीमध्येही जाऊन भरु शकतात. योजनेविषयी कोणत्याही प्रकारच्या अधिक माहितीसाठी अथवा अडचण आल्यास निराकरणासाठी नवी मुंबई महापालिकेने ९९६९००८०८८ / ९७०२३०९०५४ / ९३७२१०६९७६ असे मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. याशिवाय शासनाच्या महिला-बालविकास विभागाने १८१ टोल फ्री महिला हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे. त्यावर नागरिक सहज संपर्क साधू शकतात.
योजनेस पात्र लाभार्थी महिलांनी याची नोंद घेऊन नारीशक्ती दूत ॲप द्वारे ३१ ऑगस्टपर्यंत स्वतः अर्ज करावा. अथवा महापालिकेने सुरु केलेल्या आपल्या नजिकच्या मदत कक्षाला भेट देऊन अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. -डॉ.कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.