संततधार पावसाने महापे एमआयडीसी परिसर जलमय

वाशी : २० जुलै रोजी पहाटेपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे महापे एमआयडीसीतील महापे जंक्शन येथे सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पाणी साचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे महापे एमआयडीसी मधील कारखाने तसेच हॉटेल मध्ये पाणी शिरले. तर रस्त्यावर देखील कमरेभर पाणी साचल्याने वाहन चालकांना देखील  वाट काढताना मोठी कसरत करावी लागली .

महापे औद्योगिक वसाहती मधील नैसर्गिक नाल्यात केलेला परस्पर बदल, अपुरी नाले सफाई तसेच नैसर्गिक नाल्यात केलेला डेब्रिजचा भराव आता नैसर्गिक आपत्तींना आमंत्रण देत असून, त्याचा प्रत्यय २० जुलै रोजी महापे परिसरात आला. महापे जंक्शन जवळील नैसर्गिक नाला डेब्रिज टाकून बुजवण्यात आला आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक नामदेव डाऊरकर यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, एमआयडीसी प्रशासनाने नामदेव डाऊरकर यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास महापे एमआयडीसी मधील हॉटेल चालक तसेच प्रवाशांना सहन करावा लागला.

२० जुलै रोजी पहाटेपासून पडलेल्या जोरदार पावसामुळे सकाळी महापे एमआयडीसी भागात कमरेभर पाणी साचले होते. साचलेले पाणी महापे येथील हॉटेल मध्ये शिरल्याने वित्तहानी झाली आहे.तर मुसळधार पावसाचा सार्वजनिक तसेच खाजगी वाहतुकीला देखील फटका बसला. कमरेभर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची मोठीच तारांबळ उडाली.

महापे जंक्शन येथील पेट्रोल पंप समोरील नाल्यात भराव टाकला गेल्याने या नाल्यातील पाण्याचा योग्य निचरा होत नाही. याबाबत आपण एमआयडीसी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्या तक्रारींकडे एमआयडीसी प्रशासन कायम दुर्लक्ष करीत आलेले आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी पाणी भरुन कुठली जीवितहानी झाली तर त्यास सर्वस्वी जबाबदार एमआयडीसी अधिकारी असणार आहेत. - नामदेव  डाऊरकर, माजी नगरसेवक - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरणच्या मच्छी मार्केट मध्ये माशांची आवक वाढली