वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
जोरदार पावसाचा ‘एपीएमसी मार्केट'ला फटका
वाशी : नवी मुंबई शहरामध्ये २० जुलै रोजी पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने वाशी मधील मॅपको मार्केट रस्त्यापासून ते एपीएमसी मार्केटचा पूर्ण परिसर जलमय झाल्याचे चित्र दिसत होते. रस्त्यावर तुडुंब पाणी साचल्याने नागरिकांना या पाण्यातून पायवाट काढताना तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आणि एपीएमसी प्रशासन करीत असलेल्या मान्सूनपूर्व नालेसफाई कामाचीही पोलखोल झाली.
२० जुलै रोजी पहाटेपासूनच पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील व्यापारी आणि शेतकरी यांना देखील बसला आहे.पावसाचा जोर वाढल्याने एपीएमसी मार्केटकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. याचा सर्वात जास्त फटका भाजी उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना बसला असून, भाजीपाल्याला उठाव मिळाला नाही. त्यामुळे भाजी तशीच पडून राहिल्याने आणि पावसाने भाजी भिजल्याने भाजी फेकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली. मुसळधार पावसामुळे एपीएमसी बाजारात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.