वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
ऐरोली मधील महापालिका रुग्णालयात एकच स्त्री रोग तज्ञ
वाशी : ऐरोली येथील नवी मुंबई महापालिका राजमाता जिजाऊ रुग्णालयात गर्भवती महिलांना तपासणी करण्यासाठी एकच स्त्री रोग तज्ञ असल्याने या ठिकाणी महिलांना सहा-सहा तास ताटकळत राहावे लागत आहे.त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त स्त्री रोग तज्ञाच्या नियुक्तीची मागणी होत आहे.
नवी मुंबई शहरात महापालिकेने सर्वसामान्यांना उपचारासाठी वाशी, नेरुळ, ऐरोली येथे सार्वजनिक रुग्णालये उभारली आहेत. मात्र, या रुग्णालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऐरोली मधील राजमाता जिजाऊ रुग्णालय देखील असुविधांमुळे चर्चेत आले आहे.या ठिकाणी रोज २०० ते २५० गर्भवती महिला तपासणी करण्यासाठी येत असतात. मात्र, या रुग्णालयात गर्भवती महिलांची तपासणी करण्यासाठी एकच स्त्री रोग तज्ञ असल्याने गर्भवती महिलांना पाच-सहा तास वाट पाहत बसावे लागते. दुसरीकडे ऐरोली मधील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील कर्मचारी देखील गर्भवती महिलांसोबत उध्दटपणे वर्तणूक करतात. त्यामुळे या ठिकाणी तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने ऐरोली मधील राजमाता जिजाऊ रुग्णालय मध्ये अतिरिक्त स्त्री रोग तज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.याबाबत नवी मुंबई महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.
------------------------------------------
ऐरोली मधील राजमाता जिजाऊ रुग्णालयात गर्भवती महिला तपासणीसाठी येतात. मात्र, या रुग्णालयात गर्भवती महिलांची तपासणी करण्यासाठी एकच स्त्री रोग तज्ञ असल्याने महिलांना पाच-सहा तास ताटकळत राहावे लागते. तपासणीसाठी गर्भवती महिलांनी काहीही न खाता-पिता ५-६ तास कसे थांबायचे? . त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त स्त्री रोग तज्ञाची नेमणूक होणे गरजेचे आहे. - प्रिया भुजबळ, कोपरखैरणे.