वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
उरण तहसील कार्यालयात गळती
उरण : उरण तहसील कार्यालयातील आरसीसी स्लॅबला पाण्याची गळती लागल्याने सध्या पावसाळ्यात या कार्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, नागरिक आणि शेतकऱ्यांवर जल अभिषेक होत आहे. त्यामुळे लाद्यांवर साचून राहणाऱ्या पाण्यात पाय घसरुन दुखापत होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी व्यवतीशः लक्ष घालून दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी ‘पीडब्ल्यूडी'ला आदेश देण्याची मागणी होत आहे.
उरण तहसील कार्यालयात दररोज अनेक विद्यार्थी, नागरिक, शेतकरी आपली महसूल संबंधित तसेच शासकीय कामे करण्यासाठी ये-जा करत आहेत. मात्र, अशा विद्यार्थ्यांना, नागरिकांना, शेतकऱ्यांना कार्यालयातील अनेक नागरी सुविधांच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून उरण तहसील कार्यालयाला पावसाळ्यात लागलेल्या गळतीची समस्या गंभीर बनली होती. यासंदर्भात तसेच कार्यालयातील नागरी सुविधा संदर्भात अनेक वेळा आवाज उठवण्यात आला होता.
मात्र, संबंधित प्रशासनाने तहसील कार्यालयात पिण्याचे पाणी, शौचालय, बसण्याचे बाकडे यांची योग्य प्रकारे सांगड न घालता, फक्त लाखो रुपये खचर्ुन इमारतीच्या छतावर नियोजन शुन्य कारभारातून पत्र्याची शेड तयार केली. त्यामुळे याही वर्षीच्या पावसाळ्यात तहसील कार्यालयातील आरसीसी स्लॅबला पाण्याची गळती लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत लाद्यांवर साचून राहणाऱ्या पाण्यात पाय घसरुन एखाद्याला दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने दुरुस्तीचे काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थी वर्ग करत आहेत.