वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
‘नवी मुंबई'चा पुन्हा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक
नवी मुंबई : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ‘अमृत 2” प्रकल्पांतर्गत विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित ‘नळातून पेयजल' या राष्ट्रीय कार्यशाळेत ‘नवी मुंबईतील नाविन्यपूर्ण जलदेयके वितरण-संकलन यंत्रणा (Innovative Billing and Collection Mechanism of Navi Mumbai) या विषयावर सादरीकरण करण्यास नवी मुंबई महापालिकेला निमंत्रित केले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा प्रणालीविषयी विस्तृत माहिती देत राष्ट्रीय कार्यशाळेत प्रभावी सादरीकरण केले. यामुळे नवी मुंबई महापालिकेचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर आणखी उंचावलेला आहे.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण-शहरी व्यवहार मंत्रालयच्या अतिरिक्त सचिव तथा ‘अमृत प्रकल्प'च्या राष्ट्रीय मिशन संचालक डी. थारा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या पाणीपुरवठा विषयक महत्वाच्या राष्ट्रीय कार्यशाळेत देशभरातील विविध शहरांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सर्व शहरांना पुरेसा पाणीपुरवठा होईल असे व्यवस्थापन करणे आणि त्याचे सुयोग्य नियोजन करणे याविषयी या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे काही शहरात राबविल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा विषयक उल्लेखनीय कार्यप्रणालीचे सादरीकरणही सर्वांच्या माहितीसाठी आयोजित केले होते.
यामध्ये नवी मुंबईची पाणीपुरवठा देयके वितरण करण्याची आणि संकलित करण्याची वैशिष्ट्यपूर्ण कार्यप्रणाली राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करण्याची संधी ‘नमुंमपा'ला देण्यात आली. त्या अनुषंगाने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीसह पाणीपुरवठा देयकांचे वितरण आणि संकलन यंत्रणेविषयी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. याप्रसंगी उपस्थित देशातील विविध शहरांच्या अधिकारी प्रतिनिधींकडून सदर कार्यप्रणालीची प्रशंसा करण्यात आली.
‘नमुंमपा'मार्फत २४X७ पाणीपुरवठा योजनेची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जात असून पाणीपुरवठा व्यवस्थेवरील नियंत्रणात्मक स्काडा प्रणाली अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले जात आहे. त्याचप्रमाणे पाणी देयक भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यादृष्टीने युपीआय आणि क्यूआर कोड द्वारे देयक भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.
दरम्यान, अमृत प्रकल्प अंतर्गत आयोजित सदर पाणीपुरवठा विषयक राष्ट्रीय कार्यशाळेस नमुंमपा आयुक्तांसमवेत अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता वसंत पडघन, अभियंता स्वप्निल देसाई उपस्थित होते.
नवी मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थापन प्रणालीची दखल राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकार मार्फत घेण्यात आली आहे. नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या दृष्टीने ती अभिमानाची गोष्ट आहे. - डॉ.कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.