भूखंडावर बांधकाम परवानगी न देता नाहक अडवणूक

वाशी : पीएपी सदराखाली एमआयडीसी मार्फत प्रकल्पग्रस्तांना २०२१ साली भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी लागणारी सर्व शासकीय रक्कम प्रकल्पग्रस्तांनी भरुन देखील एमआयडीसी प्रशासनाने भूखंडावर बांधकाम परवानगी न देता नाहक अडवणूक करुन ठेवली आहे. त्यामुळे ‘एमआयडीसी'च्या या तुघलकी कारभाराविरोधात नवी मुंबई प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहेत.

‘एमआयडीसी'ने नवी मुंबई मध्ये औद्योगिक वसाहत वसवण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. या संपादित जमिनीच्या मोबदल्यात एमआयडीसी प्रशासनाच्या धोरणानुसार  भूखंड वितरीत केले जातात. याच धर्तीवर ठाणे-बेलापूर सर्व्हिस रोड लगत  एकूण २८  भूखंडांचे वाटप करण्यात आले  आहे. मात्र, सदर भूखंड वाटप करुन देखील या भूखंडांवर बांधकाम करण्यास ‘एमआयडीसी'ने परवानगी न दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयात धाव घेतली होती.  न्यायालयाने देखील बांधकाम परवानगीचे आदेश दिले आहेत.मात्र, न्यायालयाच्या निर्णयालाही ‘एमआयडीसी'ने केराची टोपी दाखवत बांधकाम परवानग्या अडवल्या आहेत. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त हवालदिल झाले असून, त्यांनी १८ जुलै पासून एमआयडीसी कार्यालय बाहेर आमरण उपोषण पुकारले आहे, अशी माहिती प्रकल्पग्रस्त नितीन काळे यांनी दिली.

दरम्यान, याबाबत ‘एमआयडीसी'चे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 एमआयडीसी मधील एकाच भूखंडावरील ३७५ झाडांवर लवकरच कुऱ्हाड?