वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा मोहीम
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी माझी वसुंधरा ४.० अंतर्गत महापालिकेच्या वतीने यावर्षी देखील ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अतंर्गत नागरिकांना कमी किंमतीत शाडू मुर्ती उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका तर्फे कार्यक्षेत्रातील १० गणेश मुर्तीकारांना मोफत १२ टन शाडूची माती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी शाडुच्या अगर लाल मातीच्या गणेशमुर्ती खरेदी करुन पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
‘केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व सण आणि उत्सव पर्यावरणपूरक साजरे करणे बंधकारक आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा सण आहे. त्यामुळे महापालिका कायक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जास्तीत जास्त चालना देण्यासाठी मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागात पर्यावरणपूरक गणेशमुर्ती विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देणे आणि मुर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जेणेकरुन पनवेल महापालिका क्षेत्रात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमुर्तीच्या वापरामध्ये घट होईल. तसेच पनवेल मधील तलावांचे आणि नदीतील पाण्याचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे.
‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिमेंतर्गत पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील रोडपाली, भिंगारी, ओएनजीसी, पनवेल कुंभारववाडा अशा विविध ठिकाणच्या १० गणेशमुर्तीकारांना ३०० शाडू मातीच्या पिशव्या घरपोच देण्यात आल्या आहेत. यातील प्रत्येक शाडुच्या मातीच्या पिशवीचे वजन ४० किलो ग्रॅम आहे. अशी १२ टन शाडू माती  मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचबरोबर महापालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील शाडू मातीच्या श्री मुर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
गणोशोत्सव साजरा करताना केवळ  पर्यावरणपूरक गणेश मुर्तीच नाही तर गणपती बाप्पाची सजावट देखील पर्यावरणपूरक करावी. गणेशाची आराधना आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी अशा दोन्हींची मंगलमय सांगड घालून या वर्षीच्या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करुया.
-मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका.