आषाढी एकादशीला साधला वृक्ष पूजनाचा योग

नवी मुंबई : यूथ कौन्सिल, नेरुळ आणि गजानन महाराज भक्त मंडळ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या नेरुळ येथील सावली रोपवाटिकेत १७ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वृक्ष पूजन व वृक्षारोपण करण्यात आले. नेरुळ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिक मीराताई चंद्रशेखर कुलकर्णी उपस्थित होत्या. या प्रसंगी विचारमंचावर माजी नगरसेविका मीरा पाटील, पं. जितेंद्र कुलकर्णी गुरुजी, दै. ‘नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत, सामाजिक कार्यकर्ते हरीश इंगवले उपस्थित होते.

या कार्यक्रमात विद्याभवन सेकंडरी हायस्कूल नेरुळची विद्यार्थिनी कु. भक्ती संतोष गावडे हिने खेळात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करुन शालांत परीक्षेत चांगले गुण मिळविल्याबद्दल तर वास्तुविशारद कु. नम्रता अनिल परब हिने आर्कटिेवट क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करुन अनेक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल दोघींचा प्रशस्तीपत्र, शाल, गुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा मीरा कुलकर्णी यांनी अध्यापन क्षेत्रात कार्यरत राहून साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सन्मान पत्र, शाल, गुच्छ देऊन  सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या ग्रंथालयाचे प्रमुख विकास साठे यांच्या कार्य कुशलतेबद्दल तसेच महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक फेसकॉम येथे निवडणूक अधिकारी म्हणून झालेल्या निवडीबद्दल त्यांनाही गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. रुचिता कर्पे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने गुच्छ देऊन त्यांनाही हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी राजेंद्र घरत, सौ. मीरा पाटील, पं. जितेंद्र कुलकर्णी गुरुजी, अरविंद वाळवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुण्या सौ. मीरा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून आषाढी एकादशी व अध्यात्मासह वारीचे महत्त्व सखोलपणे विशद करुन यातील वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट केला. सुभाष हांडे देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. तर दिलीप जांभळे यांनी  आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शिवाजीराव शिंदे, अशोकराव महाजन, दत्ताराम आंब्रे, रमेश सुर्वे, रवींद्र कांबळे, अंकुश शिंदे, दिलीप चिंचोले,  भालचंद्र माने, विजय निंबाळकर, जयेश भावसार, नरेश विचारे आदिंनी मेहनत घेतली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 माझी वारी आनंदवारी मधून बाळगोपाळांचा संत मेळावा आणि वृक्षदिंडी