वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
ठाणे महापालिकेची प्लास्टिक बंदी मोहीम तीव्र
ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समित्यांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सिंगल युज प्लास्टिकबंदी मोहिम तीव्र स्वरुपात राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, प्रभाग समिती मधील अतिक्रमण-निष्कासन विभागामार्फत सदरची कारवाई सुरु आहे. १ ते १५ जुलै २०२४ या कालावधीत करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण १३९३ आस्थापनांवर कारवाई करुन एकूण ८०३.२६ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या कारवाईपोटी ४.०१ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, प्रभाग समिती मधील अतिक्रमण-निष्कासन विभागामार्फत १५ जुलै रोजी विविध प्रभाग समित्यांमध्ये करण्यात आलेल्या सिंगल युज प्लास्टिक कारवाईवेळी २८८ आस्थापनांना भेटी देवून एकूण २५१ किलो प्लास्टिक जप्त करुन संबंधितांकडून ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली.
 दिवा प्रभाग समिती अंतर्गत ५२ आस्थापनांकडून १३ किलो, मुंब्रा प्रभाग समिती मधील ४५ आस्थापनांकडून ५६ किलो, वागळे विभागातील ५६ आस्थापनांकडून ७.५ किलो, कळवा प्रभागात ३५ आस्थापनाकडून ९ किलो, वर्तकनगर मध्ये २० आस्थापनांकडून ४ किलो, माजिवडा-मानपाडा भागातून १४७ किलो तर उथळसर प्रभागामध्ये ४० आस्थापनांवर कारवाई करुन १४.५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण विभागाच्या उपायुवत अनघा कदम यांनी दिली.
सिंगल यूज प्लास्टिक बंदी अंतर्गत महापालिकेची कारवाई तीव्र स्वरुपात राबविण्यात येत आहे. विक्रेत्यांकडे असलेला प्लास्टिकचा साठा जप्त करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सदरची कारवाई महापालिकेकडून नियमित सुरु राहणार असून नागरिकांनी देखील सिंगल युज प्लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. -सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका.