भाजीविक्रेत्या महिलेचा मुलगा सीए

डोंबिवली : आयुष्यभर कष्ट करुन आपल्या मुलाने मोठ्या क्षेत्रात नाव कमवावे, असे प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए झाल्याने तिचा आनंद गगनात मावेना झाला. सीए झाल्यानंतर मुलगा आईला भेटल्यावर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मुलाला मिठी मारत ‘माझ्या कष्टाच चीज झालं' अशी त्यांची प्रतिक्रिया बरेच काही सांगून गेली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. रवींद्र चव्हाण यांनी योगेश आणि त्याच्या आईचे कौतुक केले आहे.

योगेश ठोंबरे असे या सीए झालेल्या मुलाचे नाव असून तो खोणी गावात राहतो. योगेची आई निरा ठोंबरे या डोंबिवली गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात. त्या गेल्या २२ ते २५ वर्षांपासून याच ठिकाणी भाजी विकतात. भाजी विक्री व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुध्दा नव्हते. त्यांनी २०० रुपये उसने घेऊन भाजी विक्री व्यवसायाला सुरुवात केली. बेताची परिस्थिती असताना सुध्दा नीरा यांनी एकट्याने घर, संसार सांभाळत सदर व्यवसाय केला आहे. पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, त्यांनी कठीण परिस्थितीमध्येही हार मानली नाही.

सीए बनायचे असे मनाशी ठरवून खूप अभ्यास केला. रिझल्ट समोर आला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हीच गोड बातमी घेऊन मी आईला सांगायला गेलो, तेव्हा आई नेहमीप्रमाणे भाजी विकत बसली होती. आईला मिठी मारली आणि तो सर्व क्षण मित्रांनी मोबाईलमध्ये कैद केला, असे योगेश ठोंबरे याने सांगितले.

आगरी समाजातील मुलगा झाला सीए...

याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे, याची कल्पना मला नव्हती. मात्र, फोन सुरु झाले. अनेक मोठ्या नेत्यांनी टि्‌वट केले. मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातील एक मुलगा इंग्रजीची भिती न बाळगता आज सीए झाला. डोंबिवलीकरांनी सुध्दा त्या मुलाचे आणि त्याच्या माऊलीचे कौतुक केले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मॉडर्न स्कुलमध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा