वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
कांदळवन जागेत डेंब्रिज टाकून गोदाम उभारणी
वाशी : स्वच्छ आणि सुंदर शहर अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नवी मुंबई शहराला आता डेब्रिज माफियांनी आव्हान दिले आहे. खाडीकिनारी असलेल्या खारफुटीवर राजरोसपणे डेब्रिजचा भराव टाकून गोदामे उभारली जात आहेत. त्यामुळे खाडीकिनारी असलेल्या खारफुटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
नवी मुंबई शहरातील कांदळवने नष्ट होत चालली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात नवी मुंबई शहरावर मोठे संकट उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई शहरात भूमाफियांची संख्या प्रचंड प्रमाणत वाढत असून, भूमाफिया कंदळवनाचा भाग नष्ट करत त्यावर ‘डेब्रिज'चा भराव टाकून सुरुवातीला मैदाने उभारत आहेत. त्यानंतर त्या मैदानांवर भंगारांचे गोदाम, कोळशाचे गोदाम अशी वेगवेगळ्या प्रकारची गोदामे सुरु केली जात असल्याचे चित्र सध्या सानपाडा, जुईनगर, नेरुळ विभागात पाहायला मिळत आहे.
याशिवाय ठाणे-बेलापूर हद्दीतील वाहत्या मोठ्या नाल्याला अडथळा निर्माण करुन नाला नष्ट करण्याचा प्रयत्न देखील सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जोरदार पाऊस आला तर पूर येण्याची स्थिती निर्माण होऊन पाणी थेट इमारतींमध्ये घुसून भयानक परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यवत केली जात आहे. कांदळवन नष्ट करुन थाटलेल्या अनधिकृत गोदामांची लाखो रुपयांची कमाई येणाऱ्या काळात नवी मुंबई मधील नागरिकांच्या जीवाशी खेळणार की काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बिनधास्तपणे खारफुटी जागेत राडारोडा टाकून अतिक्रमण केले आहे. तर काही भुमाफियानी खारफुटी जागेत राडारोडा टाकून गोदामे उभारली असून, त्यातून बक्कळ भाडे देखील भुमाफियांना मिळत आहे. तसेच या गोदामांमध्ये वीज पुरवठा कसा आणि कोणाच्या मार्फत झाला, या गोदामांवर कारवाई का होत नाही?, या गोदामांतून गर्दुल्ल्यांनी दंडकशाही करुन नको ते प्रकार केले तर त्यास जबाबदार कोण?, असे प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
सानपाडा, जुईनगर, नेरुळ विभागातील कांदळवनाचा भाग सिडको हद्दीत आहे. याबाबत ‘सिडको'कडे अहवाल देखील पाठवला आहे. तसेच यापुढील बैठकीत यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. - सुधीर मांजरेकर, वनविभाग अधिकारी - नवी मुंबई.