तुर्भे मधील रस्त्यातील खड्डे भरण्यास सुरुवात

तुर्भे : मागील काही दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे तुर्भे विभागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास सदर बाब आणून देखील नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. यामुळे तुर्भे परिसरातील जनतेमध्ये संतापाचे वातावरण होते. याविषयी वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत नवी मुंबई महापालिका तुर्भे  विभाग कार्यालय क्षेत्रातील रस्त्यावरील सर्व ठिकाणचे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

तुर्भे विभागामध्ये तुर्भे गाव, सेक्टर-२१,  वाशी-तुर्भे लिंक रोड, एपीएमसी, सेक्टर २६, वाशी विभाग येथील प्रत्येक चौकामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराकरिता केबल टाकण्यासाठी चर खोदले होते. केबल टाकल्यानंतर या चरांमध्ये थातूरमातूर डांबरीकरण करण्यात आले होते. परिणामी पहिल्या पावसातच या चरांमधील सर्व डांबरीकरण निघून गेले असून, त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाशी आणि तुर्भे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते योग्य प्रकारे बुजवले न गेल्याने या विभागात सीसीटीव्ही कॅमेरे तेथे खड्डे असे समीकरण झाले होते. त्यामुळे खड्ड्यांतून वाहने चालवून कंबरडे मोडून घेण्याशिवाय स्थानिक नागरिक, वाहनचालक, प्रवाशी यांना पर्याय उरला नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर रस्तयांवरील खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली होती. तसेच सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे दिशेन जाणाऱ्या तुर्भे उड्डाणपुलाच्या मार्गिकेवरील डांबरीकरण उखडू लागले आहे. विशेष म्हणजे नुकतेच या मार्गिकेचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याशिवाय, कोपरी सिग्नल, पावणे, एपीएमसी सिग्नल, अरेंजा कॉर्नर सिग्नल येथे रस्त्यावर खड्डे पडले होते. मॅपको मार्केट समोर, योगी एक्झिक्युटिव्ह हॉटेल समोर काँक्रिट रस्त्यावर तीन फूट रुंद अर्धा आणि फूट खोल पडलेल्या खड्ड्यातील सळ्या बाहेर आल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी खडी आणि ग्रिड तसेच पेवर ब्लॉक याद्वारे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कांदळवन जागेत डेंब्रिज टाकून गोदाम उभारणी