तळोजा कारागृहावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर

कारागृहातील गैरप्रकारांना बसणार आळा -गुप्ता

खारघर : कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांची हाणामारी रोखण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात ४५१ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून त्यापैकी ३३१ सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची अद्यायावत अशी सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सीसीटिव्ही कॅमेरा यंत्रणेचे उद्‌घाटन १५ जुलै रोजी अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक (कारागृह-सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कारागृह उपमहानिरीक्षक (दक्षिण विभाग भायखळा, मुंबई-८) योगेश देसाई तसेच ‘तळोजा कारागृह'चे अधीक्षक प्रमोद वाघ, उपअधीक्षक महादेव पवार, जितेंद्र काळे, राहुल झुटाळे आणि इतर तुरुंगाधिकारी उपस्थित होते.  

कारागृहातील कैद्यांची हाणामारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात तळोजा मध्यवर्ती कारागृहामध्ये ३३१ सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची अद्यायावत यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे कारागृहातील घडामोडींवर आणि कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. अत्याधुनिक असलेल्या सदर सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमध्ये एआय टेक्नॉलॉजीचा देखील वापर करण्यात आला आहे. कारागृहातील गैरप्रकार रोखणे तसेच बंदीस्त असलेल्या कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.  

कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधण्यासाठी तळोजा कारागृहाला नवीन १५ व्हिडीओ कॉन्फरन्सींग यंत्रणा प्राप्त झाल्या असून सदरची यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच कारागृह सुरक्षेसाठी बॉडी स्कॅनर मशीन देखील या कारागृहास उपलब्ध करुन देण्यात आले असून या सुविधेचा वापर कैद्यांची झडती घ्ोण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारागृहात लावण्यात आलेल्या सदर अत्याधुनिक यंत्रणेमुळे कारागृहातील प्रत्येक कैद्यावर लक्ष राहणार आहे. तसेच कारागृहातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे, असा विश्वास अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.

तळोजा मध्यवर्ती कारागृह राज्यातील एक महत्त्वाचे कारागृह म्हणून ओळखले जाते. या कारागृहाकडे संवेदनशील म्हणून पाहिले जाते. त्याचे कारण म्हणजे कारागृहात बंदिस्त असलेले आरोपी. अगदी चोरट्यांपासून ते बॉम्बस्फोटातील आणि नामचीन टोळ्यांतील गुंडांपासून ते बड्या गुन्ह्यातील आरोपींना या कारागृहात ठेवल जाते. तळोजा कारागृहात सध्या २९६८ कैदी शिक्षा भोगत आहे. सदर कारागृहात अनेक वेळा कैद्यामध्ये मारामारी, तसेच काही कैद्यानी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहे. काही वर्षांपूर्वी कारागृहात कैद्याकडे मोबाईल सापडल्याचे प्रकार घडले होते. मात्र, आता कारागृह परिसर तसेच कैद्यांच्या हालचालीवर  नजर ठेवण्यासाठी सिसिटिव्ही कॅमेरे उपलब्ध झाले असून त्याद्वारे सर्व कैद्यांची हालचाली दिसून येणार आहे.

तळोजा कारागृहातील कैद्यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारागृहात सीसीटिव्ही नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षात २४ तास २ कर्मचारी कार्यरत असणार आहे.  -महादेव पवार, उपअधीक्षक - तळोजा मध्यवर्ती कारागृह. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अमृतमहोत्सवी कवि संमेलनात पावसाच्या कविता सादर