वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
तळोजा परिसरात कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्ग उभारणी कामाला सुरुवात
खारघर : तळोजा परिसरातील गावालगत कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्ग उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, पिल्लर उभारणीसाठी खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे तळोजा वसाहत लगत असलेल्या जमिनीच्या किमतीत मागील वर्षीपेक्षा दुप्पटीने वाढ झाली आहे. मेट्रो रेल्वे स्थानक लगत असलेल्या जमिनी मिळविण्यासाठी बांधकाम व्यावसायिक दलालांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याचे ग्रामस्थांकडून समजते.
कल्याण, डोंबिवली या शहरांना थेट नवी मुंबई शहराशी जोडणाऱ्या कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तळोजा परिसरातील मेट्रो मार्गात पिल्लर उभारणीसाठी मशीन द्वारे खोदकाम  करण्यात येत आहे.  कल्याण-तळोजा मेट्रो मार्गामुळे तळोजा एमआयडीसी, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात व्यवसाय तसेच नोकरी करणाऱ्या चाकरमान्याचा प्रवास सुखकर आणि कमी वेळेत होणार आहे.  कल्याण-तळोजा मेट्रो मार्गामध्ये तळोजा वसाहत लगत असलेल्या बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे, धानसर, पिसावे, बाम्मली आणि नऱ्हेन आदी गावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या गावातील   ग्रामस्थांचा शेती हाच एकमेव व्यवसाय आहे. पावसाळ्यात भातशेती तर काही ग्रामस्थ हिवाळा आणि उन्हाळ्यात भाजीपाला लागवड करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, गेल्या काही वर्षात वाढत्या प्रदूषणामुळे शेती आणि भाजीपाला व्यवसाय मोडीत निघाला आहे. ‘सिडको'ने नवी मुंबई मेट्रो प्रकल्प हाती घेतल्यावर भविष्यात तळोजा-कल्याण मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, लोकसभा निवडणूक पूर्वी कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाल्यानंतर मेट्रो मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होताच बांधकाम व्यावसायिक बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे आदी गावातील मेट्रो स्थानक लगतची जमीन मिळविण्यासाठी राजकीय नेते आणि दलालाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांची भेट असल्यामुळे जमिनीच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. मागील वर्षी अकरा ते बारा लाख रुपये गुंठा दराने विक्री होत असलेल्या जमिनीचे दर सध्या पंधरा ते तीस लाख गुंठा असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्ग नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्गातील अमनदूत मेट्रो स्थानकाला जोडण्यात येणार आहे. मेट्रो मार्गामुळे खारघर वसाहतीत उभारल्या जाणाऱ्या घरांना मोठी किंमत आली आहे.भविष्यात मेट्रो सुरु झाल्यावर जमिनीच्या किमतीत भरमसाठ होणार असल्यामुळे काही शेतकरी ‘वेट आणि वॉच'च्या भूमिकेत आहेत. तर अडचणीत असलेले काही शेतकरी चांगला भाव आल्यास जागा विक्रीसाठी तयार आहेत.
कल्याण-तळोजा मेट्रो मार्गामुळे जमिनीच्या दरात वाढ झाली आहे. मेट्रो स्थानक लगत असलेल्या जमिनीचे भाव अधिक आहेत. तर मेट्रो रेल्वे स्थानकापासून दूर असलेल्या जमिनीचा भाव कमी आहे. कल्याण-तळोजा मेट्रो सुरु झाल्यानंतर जमिनीला चांगली किंमत येणार असल्यामुळे बहुतांश शेतकरी जमीन विक्रीकडे दुर्लक्ष करीत आहेत. - संजय भोईर, ग्रामस्थ - तुर्भे.
कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे बांधकाम व्यावसायिक तसेच काही नागरिक जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांशी संपर्क करत आहेत. - वाल्मिकी पावसे, सामाजिक कार्यकर्ते - बामल्ली गाव, तळोजा.
कल्याण-तळोजा मेट्रोमुळे मेट्रो स्थानक लगतच्या गावातील जमिनीच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी जमिनीचे दर प्रती गुंठा १५ ते १६ लाख रुपये होते. सध्यस्थितीत ३० लाख रुपये प्रती गुंठा भाव सुरु आहे. - स्वप्नील पाटील, ग्रामस्थ - पिसार्वे गाव.