पगार कधी देणार, कुटुंबाचा गाडा कसा हाकणार?

नवीन पनवेल : महिन्याच्या पगाराची तारीख उलटून गेली तरी ‘राज्य परिवहन महामंडळ'च्या कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन दिले गेले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त भावना उफाळून आली आहे. याचा निषेध म्हणून रापम कर्मचाऱ्यांनी १२ जुलै रोजी मुंबई विभागाच्या वतीने पनवेल आगारामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली.

राज्य सरकारकडून लाखो रुपयांची खैरात विविध सवलतीच्या माध्यमातून केली जाते. त्यासाठी करोडो रुपयाचा चुराडा देखील केला जातो. परंतु, ज्यांच्या माध्यमातून सदर सर्व केले जाते, त्या ‘राज्य परिवहन महामंडळ'च्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन तरी वेळेत मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.

शासनाच्या अन्य विभागाच्या तुलनेत ‘राज्य परिवहन महामंडळ'च्या कर्मचाऱ्यांना पगार खूप कमी आहे. त्यातच सुख-सुविधाची देखील मोठ्या प्रमाणात वानवा आहे. कर्मचाऱ्यांच्या न्यायिक हक्काच्या मागण्या देखील वेळोवेळी आश्वासन देऊन प्रलंबित ठेवली जातात. अशातच त्यांना वेतन तरी वेळेत मिळावी, हीच अपेक्षा आहे. यावेळी तर जुलै महिन्याची १२ तारीख उलटून गेली तरीही अद्याप कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही. परिणामी, दैनंदिन गरजा कशा प्रकारे पूर्ण कराव्यात असा पेच प्रसंग उभा ठाकला आहे .

सदर निदर्शन आंदोलनामध्ये विभागातील सर्व ‘युनियन'चे पदाधिकारी सभासद आणि अधिकारी वर्ग सहभागी झाले होते. दरम्या, वेळेत पगार न झाल्यास अजून तीव्र स्वरुपात आंदोलने केली जातील, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी विभागीय सचिव विजय कोळी, आगाराध्यक्ष अशोक ठाकूर, निलेश नार्वेकर, लीना राऊत, पूजा खेडेकर, आर. आर. ठोंबरे, संजय पाटील, अजय कुचेकर, राजेश मेहता, महेश बनसोडे, ‘कामगार सेना'चे सतीश नलावडे, उध्दव पुकळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 तळोजा परिसरात कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्ग उभारणी कामाला सुरुवात