वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
घोडबंदर रोडवरील कामे जलदगतीने पूर्ण करावीत -आयुक्त सौरभ राव
ठाणे : मागील आठवडाभर घोडबंदर रोडवर होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ११ जुलै रोजी पूर्वद्रुतगती महामार्गावरील माजिवडा जंक्शन ते कापूरबावडी जंक्शनपर्यत विविध प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ‘मेट्रोे'मार्फत सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्डे देखील दुरुस्त करण्याचे आदेश देत असतानाच सर्व प्राधिकरणांनी समन्वयाने कामे करावीत, असेही आयुवतांनी सूचित केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, आदि उपस्थित होते.
यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी ज्युपिटर हॉस्पिटल, माजिवडा नाका, कापूरबावडी परिसरात सुरु असलेल्या ‘मेट्रो'च्या कामांचा आढावा घेतला. विविध ठिकाणी ‘मेट्रो'च्या कामासाठी बॅरिकेटींग केलेले असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असून या कामामध्ये बाधा न आणता वाहतूक कोंडी कशाप्रकारे सोडविता येईल, या दृष्टीकोनातून नियोजन करावे. कापूरबावडी जंक्शनवर पेपर प्रॉडक्टस कंपनीलगत असलेल्या पुलावर गर्डर उभारण्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून सुरु आहे. सदरचे काम युध्दपातळीवर पूर्ण करुन सदरचा पुल वाहतुकीसाठी खुला करावा, अशीही सूचना आयुक्त राव यांनी यावेळी दिली.
पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडणारे खड्डे तातडीने बुजविता यावेत, यासाठी महापालिकेकडून आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्यात आले असून त्यांच्यामार्फत तातडीने उपाययोजना करण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रस्ते कोणत्या प्राधिकरणाच्या अखत्यारित येतात, ते न पाहता ज्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत, ते तातडीने बुजविण्यात येतील. पावसाळा कालावधीत करावयाच्या कामांबाबत सर्व प्राधिकरण समन्वयाने काम करुन नागरिकांना त्रास होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करण्यात येईल.
-सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका.