वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
पांडवकडा धबधबा परिसरात वन कर्मचारी तैनात
खारघर : खारघर मधील पांडवकडा धबधबा परिसरात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पनवेल वन विभाग तर्फे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर खारघर पोलिसांकडून धोकादायक पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी असल्याचे फलक खारघर परिसरातील पांडवकडा धबधबा परिसर तसेच रस्त्यावरील दर्शनी भागात लावण्यात आले आहेत.
पुणे, लोणावळा परिसरातील भुशी धरणाजवळील धबधब्याच्या प्रवाहात २ लहान मुलांसह एकाच कुटुंबातील ५ व्यवती वाहून गेल्याची घटना घडल्याचा मुद्दा राज्य विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित झाला होता. या मुद्यावर बोलताना, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील धोकादायक पर्यटन स्थळांचा आढावा घेण्याची सूचना करुन पावसाळी पर्यटनात धोकादायक पर्यटन स्थळी दुर्घटना घडू नये, पर्यटक सुरक्षित राहावे, यासाठी सर्व धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावावेत तसेच पर्यटन ठिकाणी जीवन रक्षक तैनात करण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत.
दरम्यान, खारघर येथील पांडवकडा धबधबा, आजुबाजूचा नयनरम्य निसर्ग परिसर नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील हजारो पर्यटकांचा पावसाळी पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पाऊस चांगला रुळल्यावर पर्यटकांचा ओघ पांडवकडा धबधबाकडे चालू होतो. मात्र, खारघर परिसरातील तलाव तसेच पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात गेल्या १५ वर्षात तीस पेक्षा अधिक पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली आहे.
विधानसभा सभागृहात पुणे येथील धबधब्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर रायगड जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वन विभागाकडून पांडवकडा धबधबा परिसरात २ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच खारघर पोलिसांकडून पांडवकडा धबधबा आणि तलाव परिसर पर्यटन प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करुन मनाई आदेशाचे फलक लावण्यात आले आहेत.
खारघर मधील पांडवकडा धबधबा आणि तलाव परिसरात जाण्यास मनाई असल्याच्या आदेशाचे फलक खारघर पोलिसांकडून धबधबा परिसरात लावण्यात आले आहेत. - विजय पाटील, तहसीलदार - पनवेल तालुका.
पांडवकडा धबधबा परिसरात दुर्घटना घडू नये यासाठी वन विभागाकडून दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. - डी. एस. सोनावणे, वन परीक्षेत्र अधिकारी - वन विभाग, पनवेल.
तळोजा मध्यवर्ती कारागृह समोरील तलाव ‘सिडको'च्या हद्दीत आहे. तळोजा जेल समोरील तलाव खारघर-तळोजा रस्त्यावर असल्यामुळे रस्त्याने ये- जा करणाऱ्या पर्यटकांच्या निदर्शनास सदर तलाव येताच काही वेळ थांबून पर्यटक तलावात पोहण्यासाठी धाव घेतात. शहरी भागातील बहुतांश तरुणांना पोहण्याचा सराव नसल्यामुळे तसेच दहा ते पंधरा फूट खोल असलेल्या सदर तलावाच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे गेल्या दोन वर्षात या तलावात ६ व्यवती बुडून मृत झाल्याची घटना घडली आहे. सदर तलावाच्या दर्शनी भागातील सूचना फलकांवरील अक्षरे नाहीशी झाली आहेत. या संदर्भात पनवेल महापालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी ‘तळोजा जेल समोरील तलाव ‘सिडको'च्या हद्दीत येत आहे', असे सांगितले. तर ‘सिडको'च्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता होवू शकला नाही.