खेळाचे मैदान वाचविण्यासाठी ४० प्लस खेळाडुंचे आंदोलन

नवी मुंबई : बेलापूर येथील भूखंडावर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा घाट नवी मुंबई महापालिकेने घातला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बेलापूर येथील स्थानिक खेळाडू या मैदानाचा वापर खेळण्यासाठी करीत आहेत. फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ओसाड पडलेल्या सदर भूखंडाला मैदानाच्या रूपात परिवर्तित करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी या मैदानाची जीवापाड देखभाल केली, त्याची काळजी घेतली आणि आता सदर मैदान हॉस्पिटलकरिता देण्याकरिता दबाव आणला जात आहे. त्यामुळे सदर खेळाचे मैदान वाचविण्यासाठी ४० प्लस मास्टर्स असोसिएशनच्या झेंड्याखाली नवी मुंबईमधील सर्वच गावांमधील खेळाडुंनी १२ जुलै रोजी या मैदानात आमदार मंदाताई म्हात्रे आणि नवी मुंबई महापालिका विरोधात आंदोलन केले.

या आंदोलनाचे ४० प्लस मास्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, प्रकल्पग्रस्त नेते डॉ. राजेश पाटील, दिपक पाटील,  माजी नगरसेवक लिलाधर नाईक, दिनानाथ पाटील, बाळाराम पाटील, संघटनाचे पदाधिकारी विकास मोकल, दिलीप मढवी, आदिंनी नेतृत्व केले.

बेलापूर गांवच्या हद्दीत येणारे सदर मैदान खेळासाठी राखीव ठेवण्याची मागणी आम्ही सातत्याने सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्याकडे मागणी करीत आहोत. आमचा हॉस्पिटलला विरोध नसून नवी मुंबईमध्ये अन्य ठिकाणी हॉस्पिटल उभारावे त्याला आमचा पाठिंबा आहे. ज्या ठिकाणी नागरिक सहजतेने पोहोचू शकतील, त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारावे. एकीकडे शहरांमध्ये मोकळ्या जागा वाचविण्यासाठी आणि खेळाची मैदाने सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न होताना दिसतात. तर दुसरीकडे बेलापूर येथील मैदान गिळंकृत करुन त्या ठिकाणी बेलापूरच्या खेळाडुंचे भवितव्य अंधारात ढकलण्याचे कारस्थान सुरु आहे, असे  आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून हे खेळाचे मैदान हॉस्पिटलसाठी देण्यासाठी सिडको आणि महापालिका प्रशासनावर दबाव टाकला जात आहे, असे ४० प्लस मास्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील यांनी सांगितले.

आ. मंदाताई म्हात्रे ज्या भाजपा पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, त्या पक्षाची सत्ता राज्यात आणि देशातही आहे. त्यामुळे नवी मुंबईत अन्य सुयोग्य ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी त्या सहज भूखंड प्राप्त करुन घेऊ शकतात. परंतु, बेलापूरचे खेळाचे मैदान हॉस्पिटलसाठी देण्याची त्यांची आग्रही मागणी म्हणजे बेलापूर येथील युवक, महिला आणि ज्येष्ठांसह सर्व वयोगटातील नागरिक जे खेळण्यासाठी या मैदानाचा नियमितपणे वापर करीत आहेत, त्यांच्यावर मोठा अन्याय करण्यासारखे आहे. शहरातील नागरिकांना सुदृढ आरोग्य राखण्यासाठी खेळाची मैदाने वाचवली पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे बेलापूरचे मैदान वाचविण्यासाठी आमचा सुरु असलेला लढा आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत, असेही प्रदीप पाटील म्हणाले.

दरम्यान, आंदोलनकर्त्या ४० प्लस खेळाडुंनी बेलापूर मैदानापासून नवी मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढून महापालिका मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिवत आयुवत तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी प्रभारी क्रीडा उपायुवत अभिलाषा म्हात्रे उपस्थित होत्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पांडवकडा धबधबा परिसरात वन कर्मचारी तैनात