वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
‘महाराष्ट्र भवन' उभारणीचा मार्ग सुकर
नवी मुंबई : नवी मुंबई मध्ये नव्याने उभ्या रहात असलेल्या ‘महाराष्ट्र भवन'ची वास्तू उभारणीसाठी ‘सिडको'ने निविदा प्रसिध्द केली आहे. त्यामुळे लवकरच इतर राज्यांच्या भवनांपाठोपाठ आता वाशी येथे ‘महाराष्ट्र भवन'ही असणार आहे. त्यामुळे स्थानिक आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून नवी मुंबईसह तमाम महाराष्ट्रवासियांची ‘महाराष्ट्र भवन'साठी असलेली प्रतिक्षा संपुष्टात आली आहे.
‘महाराष्ट्र भवन'ची वास्तू उभारणीकरिता १२१ कोटी रुपये खर्चाची निविदा ‘सिडको'ने नुकतीच प्रसिध्द केली आहे. वाशी रेल्वे स्थानक परिसरात देशातील इतर राज्यांची भवन उभारली गेली असून जागा उपलब्ध करुन देखील ‘महाराष्ट्र भवन' उभे रहात नव्हते. त्यामुळे ‘महाराष्ट्र भवन'च्या उभारणीसाठी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी गेल्या १० वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. आमदार सौ. म्हात्रे यांच्या शासन आणि ‘सिडको'कडील सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र भवन'ची वास्तू उभारण्याचे आदेश ‘सिडको'ला दिले होते. यानंतर ‘महाराष्ट्र भवन' वास्तुचे शेवटचे सादरीकरण नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधीमंडळातील दालनात पार पडले.
यावेळी ‘महाराष्ट्र भवन'चे सादरीकरण पाहताच उपमुख्यमंत्री पवार भाऊक झाले. एवढी मोठे भव्यदिव्य महाराष्ट्र भवन आपल्या महाराष्ट्रात होतोय, निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवी पर्वणी आहे. यासाठी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी देखील अथक प्रयत्न केल्याचे ना. अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.
आता ‘महाराष्ट्र भवन'च्या सुंदर आणि आलिशान वास्तुसाठी सिडको १२१ कोटी रुपये खर्च करणार असून सदर वास्तू १२ मजल्यांची आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ माता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदि थोर मंडळींचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये शयनगृहाच्या ११ खोल्या तर दुहेरी बेडच्या ७२, अतिथीगृह आणि इतर एकूण १६१ खोल्या असणार आहेत. सभागृहामध्ये खोल्यांसह सर्व सुख-सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशा विविध ठिकाणाहून नागरिक कामांसाठी विविध स्पर्धा परीक्षा आणि नोकर भरतीसाठी मुंबई येथे येत असतात. मात्र, जागा नसल्याने आणि हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल तो आसरा शोधतांना दिसतात. ज्या म्‘महाराष्ट्र भवन'साठी सन २०१४ पासून माझा जो लढा चालला होता, त्याला आता पूर्णविराम लागला आहे. ‘महाराष्ट्र भवन'चा फायदा नवी मुंबईलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
नागरिकांसाठी विविध कामे करताना अनेक अडचणी येतात, समस्या निर्माण होतात. अनेकदा सरकारी नियम आडवे येतात. पण, त्यावर मार्ग काढणे लोकप्रतिनिधी म्हणून माझे काम आहे. लोकांच्या हिताची कामे केल्याने मिळणारा आनंद इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा असतो. गेली ३० वर्षे मी राजकारणामध्ये याचा सातत्याने अनुभव घेतला आहे. माझा परिवार माझ्या कुटुंबापुरता मर्यादित नसून कामाच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या हजारो-लाखो नागरिकांनी संपन्न आहे. माझे आई-वडील राजकारणात नव्हते. पण, निःस्वार्थीपणे काम करण्याचे बाळकडू त्यांनी मला लहानपणापासून दिले. त्याचीच ‘महाराष्ट्र भवन'च्या निमित्ताने आठवण झाली.
-आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.