घरांच्या सोडतीसाठी ‘सिडको'ला मिळाला मुहूर्त

नवी मुंबई :  जानेवारी २०२२ रोजीच्या गृहनिर्माण योजना अंतर्गत द्रोणागिरी आणि तळोजा मधील ३३२२ सदनिकांची सोडत काढण्यास अखेर ‘सिडको'ला मुहूर्त लाभला आहे. येत्या १९ जुलै रोजी सिडको घरांची सोडत निघणार आहे. त्याबाबत या गृहनिर्माण योजनामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना ‘सिडको'ने सोडतीबाबत ऑनलाईन माहिती दिली आहे.

दरम्यान, जानेवारी २०२२ रोजीच्या योजना अंतर्गत द्रोणागिरी आणि तळोजा परिसरात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ३२२ सदनिकांपैकी द्रोणागिरी नोड येथील ६१ आणि तळोजा नोड येथील २५१ याप्रमाणे ३१२ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकासाठी तर द्रोणागिरी येथील ३७४ आणि तळोजा येथील २६३६ मिळून ३०१० सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

सदर ‘महागृहनिर्माण योजना'ची संगणकीय सोडत १९ एप्रिल २०२४ रोजी काढली जाणार असल्याचे ‘सिडको'ने फारपूर्वी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे घरांची सोडत काढणे ‘सिडको'ला शक्य झाले नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल संपुष्टात येऊन महिना लोटला तरी जानेवारी २०२४ च्या योजना अंतर्गत विक्रीस काढलेल्या ३३२२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीची घोषणा सिडको करत नसल्यामुळे घर घेणारे गोरगरीब ग्राहक हवालदिल झाले होते. अखेर येत्या १९ जुलै रोजी जानेवारी २०२४ रोजीच्या योजनेची संगणकीय सोडत सिडको काढणार असल्याची माहिती ‘सिडको'च्या गृहनिर्माण विभागाचे पणन व्यवस्थापक श्रीनिवास मोकलीकर यांनी दिली.

ग्राहकांच्या अनामत रक्कमेवर बँका गब्बर...

‘सिडको'च्या या योजना मध्ये अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी १.५० लाख रुपये तर अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी ७५ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून भरले आहेत. ‘सिडको'च्या सदर योजनेत घर घेण्यास इच्छुक असलेले सुमारे ४५०० हून गरीब नागरिक सहभागी झाले आहेत. जे नागरिक सोडतीत नशीबवान ठरणार नाहीत, त्यांच्या अनामत रक्कमेवर बँकेला मात्र सहा महिन्यांचे व्याज आणि पैसा वापरावयास मिळणार आहे. तर दुसरीकडे कर्ज काढून अनामत रक्कम भरणाऱ्या गरीब नागरिकांना मात्र त्या रक्कमेवर विनाकारण व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे ‘सिडको'ने लवकरात लवकर सदरची सोडत काढण्याची मागणी जोर धरत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘उरण नगरपरिषद' नवीन प्रशासकीय इमारत उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत