केमिकल कंपन्या स्थलांतरः शासनातर्फे कृती आराखडा समिती

डोंबिवली : डोंबिवली जवळील एमआयडीसी परिसरात २३ मे रोजी अमुदान केमिकल कंपनीत भीषण आग आणि १२ जून रोजी तारखेला इंडो अमाइन्स आणि मालदे या दोन कंपन्यांना आग लागली. सदर घटना गंभीर्याने लक्ष देत केमिकल कंपनी स्थलांतराबाबत शासनाकडून कृती आराखडा समिती नेमण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित ‘पत्रकार परिषद'मध्ये दिली.

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अमुदान या रासायनिक कंपनीत २३ मे रोजी झालेल्या रिॲवटर स्फोटामुळे जीवित आणि वित्तहानी तसेच नजिकच्या कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. डोंबिवली मधील औद्योगिक क्षेत्रात झालेल्या स्फोटाची शासनाने त्वरित दखल घेवून या संदर्भात प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अधिपत्त्याखाली २७ मे रोजी बैठक घेण्यात आली.  बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक धोकादायक, अतिधोकादायक कंपन्यांच्या स्थलांतराबाबत शासनाने कृती आराखडा तयार करण्यासाठी ‘कृती आराखडा समिती' २८ मे २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन करुन ‘समिती'मध्ये वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एमआयडीसी'तर्फे डोंबिवली मधील औद्योगिक परिसरातील कंपन्यांचे सर्व्हेक्षण सुरु असून, शासनाने दिलेल्या प्रश्नावलीनुसार माहिती एकत्र करण्यात येत आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने शासनाकडून आदेश प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आयुवत इंदूराणी जाखड यांनी सांगितले.

शासनस्तरावर उपाययोजना सुरु असतानाच १२ जून रोजी सकाळी पुन्हा डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मालदे या कंपनीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सदरची आग शेजारी असलेल्या इंडो अमेन या कंपनीत पसरल्यामुळे या आगीत कोणीही व्यक्ती जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. आगीचे वृत्ताची माहिती कळताच महापालिका आणि ‘एमआयडीसी'ने आगीवर नियंत्रणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करुन आग विझवण्यात यश मिळवले आहे, असे आयुवत डॉ. जाखड म्हणाल्या.

दरम्यान, डोंबिवली औद्यागिक परिसरातील घटनास्थळाजवळच्या ज्या नागरिकांना श्वसनाचा त्रास असल्याच्या प्राथमिक तक्रारी प्राप्त होताच अशा नागरिकांना आग आटोक्यात येईपर्यत सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहितीही महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘जल जीवन मिशन'च्या कामांना गती द्या; अन्यथा कारवाई