पनवेल महापालिका ॲक्शन मोडवर

पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक अवस्थेत असलेल्या जाहिरात फलकांवर महापालिकेच्या वतीने ११ जून रोजी कारवाई करण्यात आली.

घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेनंतर पनवेल महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. महापालिकेने कार्यक्षेत्रातील चारही प्रभागामधील ३३ अनधिकृत जाहिरात फलकांपैकी २१ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांनी घेतलेल्या विभागवार आढावा बैठकीमध्ये उर्वरित होर्डिंगचा ‘क्विक सर्वे' करुन त्यामधील अत्यंत धोकादायक होर्डिंग निष्कासित करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या होत्या..

आयुक्त चितळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार पनवेलमधील बस आगार आणि हॉटेल दत्त इन जवळील जाहिरात फलक गेले काही दिवस गंजलेल्या अवस्थेत होते. अंदाजे ४० फुट उंच असलेले सदर जाहिरात फलक धोकादायक बनले होते. शिवाय सदर परिसर अत्यंत गर्दीचा परिसर आहे. बस आगारातून रोज हजारो नागरिकांची ये-जा असते. परंतु, याठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळे कारवाई करता येत नव्हती.

महापालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक अडचणींवर मात करत अखेर सदरचे जाहिरात फलक नेस्तनाबूत करण्यात आले. यावेळी महापालिका प्रभाग अधिकारी रोशन माळी, क्षेत्रीय अभियंता संकेत कोचे, तुषार कामतेकर आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

यापुढे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिका लक्ष ठेवून असणार आहे. महापालिका क्षेत्रात अनधिकृत जाहिरात फलक आढळल्यास महापालिकेच्यावतीने कडक कारवाई करण्यात येेईल.
-मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘फ्लेमिंगो'ला ड्रोनचा धोका?