छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
डोंबिवली मध्ये पुन्हा आग
डोंबिवली : डोंबिवली मधील इंडो अमाइन्स आणि मालदे केमिकल कंपनीला १२ जून रोजी सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग लागताच कंपनीमधील कामगार बाहेर आल्याने जीवितहानी टाळली. मात्र, सदर दोन्ही कंपनी आगीत जळून खाक झाल्या. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेमुळे आजुबाजुकडील इमारतीमधील रहिवासी घाबरले आहेत. आगीच्या घटनेनंतर जवळच असलेल्या अभिनव शाळेतील विधार्थ्याना घरी पाठविण्यास आले. तर या आगीत रस्त्याच्या कडले उभी केलेल्या ३ शालेय मिनी बस आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने त्या जळून गेल्या.
डोंबिवली पूर्व मधील इंडो अमाइन्स एन्ग्रोइंटरमिडी (खत बनविण्यासाठी रॉ मटेरियल) बनविणारी कंपनी आणि कॅपेसीटर बनविणारी मालदे केमिकल कंपनी या दोन्ही कंपनींमध्ये १२ जून रोजी सकाळ १० च्या सुमारास आग लागल्याचे समजताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे १५ बंब पोहोचले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाला ४ ते ५ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर निंयत्रण मिळविण्यात आले. आग लागल्याचे समजताच कंपनीतील कामगार बाहेर धावत गेल्याने जीवितहानी टळली. आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्तांसह राजकीय नेतेममंडळी देखील घटनास्थळी पोहोचली होती.
आगीची घटना घडताच आजुबाजुला केमिकलचा वास पसरल्याने नागरिक पुरते वैतागले होते. त्यांनी आपण राहणार कसे? असा प्रश्न मिडीयाशी बोलताना उपस्थित केला. कंपनीमध्ये प्रशिक्षित कामगार नसल्याने त्यांना आग लागल्यानंतर परिस्थिती कशी हाताळावी? हेच समजत नाही, असे ‘भाजपा'चे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब म्हणाले.
दरम्यान, २३ मे रोजी डोंबिवली मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये रिॲवटरचा मोठा स्फोट झाला होता. यावेळी लागलेल्या आगीमध्ये १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यानंतर आता पुन्हा याच भागात आग लागल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भिती पसरली आहे.
दुसरीकडे ‘बसपा'चे प्रदेश महासचिव डॉ. प्रशांत इंगळे यांनी सदर आगीच्या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना यामध्ये शासनाची दुटप्पी भूमिका दिसत असल्याचे सांगितले. स्फोटात जीवितहानी होते, याकडे कानाडोळा का केला जात आहे. लोकप्रतिनिधी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाने याकडे माणूस म्हणून बघावे आणि नंतर राजकारण करावे, असे ते म्हणाले.