सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाका; शासनाचे महापालिकांना आदेश

महाकाय होर्डिंगचा आकार, उंची होणार कमी  

नवी मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर जाग आलेल्या राज्य शासनाने पावसाळ्यापूर्वी राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग तत्काळ काढून टाकून संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश संबंधित महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाचे आयुक्त तथा संचालकांना दिले आहेत. नुकतेच सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  

भविष्यात होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र राज्यातील महापालिका क्षेत्राकरिता ‘आकाश-चिन्हे आणि जाहिरात प्रदर्शनाचे नियमन-नियंत्रण नियमावली-२०२२'ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी आणि तसा कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश ‘नगरविकास विभाग'ने ६ जून रोजी जारी केले आहेत.  

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व शहरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात उद्‌भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थीतीत पुन्हा होर्डिंग पडण्याच्या दुर्घटना घडून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून राज्य सरकारने घाटकोपर दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे.  

२८ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळापूर्व कामांची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत राज्यातील सर्व अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग तत्काळ काढून टाकतानाच संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करावेत. तसेच भविष्यात महापालिका किंवा इतर प्राधिकरणांच्या जागेत अथवा खाजगी जागेत जाहिरात फलक, होर्डिंग उभारताना संबंधित महापालिकेची अथवा प्राधिकरणे यांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.  

यासंदर्भात ‘नगरविकास विभाग'ने काढलेल्या आदेशात महापालिका क्षेत्रातील जाहिरात फलकाचा आकार आणि उंचीबाबत राज्य शासनाच्या ९ मे २०२२ रोजीच्या अधिसुचनेमध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे नमूद करण्यात आले  आहे.

अधिकृत जाहिरात फलक रस्त्याच्या पातळीपासून १० फुटापेक्षा कमी उंचीवर आणि रस्त्याच्या पातळीच्या ४० फुटापेक्षा अधिक उंचीवर उभारण्यात येऊ नये, अशी २०२२ रोजीच्या नियमावलीत तरतूद आहे. परंतु, महापालिका क्षेत्रात मोठमोठ्या आकाराचे आणि ४० फुटापेक्षा अधिक उंचीवर होर्डिंग उभारण्यात आल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. अशा प्रकारे नियमबाह्यरित्या उभारण्यात आलेल्या होर्डिंगमुळे दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे शासनाने सर्व अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.  

नियमबाह्य आकार, उंचीच्या अधिकृत होर्डिंगवर कारवाईचे आदेश...

दरम्यान, होर्डिंग उभारण्यासाठी महापालिका अथवा संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेतल्यानंतर अनेक जाहिरात एजन्सी नमूद आकार आणि उंची पेक्षा अधिक आकारमान तसेच उंचीचे महाकाय होर्डिंग उभारत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. अशा अधिक आकारमान आणि उंचीच्या अधिकृत होर्डिंगवर देखील त्वरीत कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 डोंबिवली मध्ये पुन्हा आग