पावसाळ्यात सर्पदंशाबाबत काळजी घेण्याचे सर्पमित्रांचे आवाहन

कल्याण : पावसाळा सुरु झाला असून पावसामुळे साप आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे. पावसाळ्यात जमिनीवरील छिद्रांमध्ये पाणी गेल्याने सुरक्षित निवाऱ्याच्या शोधामध्ये बेडूक आढळत असून अन्नाच्या शोधात साप बाहेर पडतात. त्यामुळे सापांना मारणे किंवा सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. सदरच्या दुर्घटना टाळण्यासाठी निसर्ग प्रेमींतर्फे विविध माध्यमांतून जनजागृतीची मोहीम सुरु आहे.

पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर बिळामध्ये पाणी साचते. त्यामुळे भक्ष्य लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जून-ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणून या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता या आपत्कालीन परिस्थितीची शास्त्रीय माहिती घ्यावी, असे आवाहन निसर्ग सर्प आणि प्राणीप्रेमी संघटनांतर्फे सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये देखील जनजागृती सुरु आहे.

घराच्या भिंती, कुंपणांच्या भिंती यांना पडलेली बीळे बुजवावीत. त्यामधील उंदरांना खाण्यासाठी साप येण्याची शक्यता असते. घराजवळ पालापचोळा, कचऱ्याचे ढीग, दगड-विटांचे ढीग, लाकडांचा साठा करुन ठेवू नये. घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. खिडवया-दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सरपण, गोवऱ्या घरा लगत ठेवता, काही अंतरावर जमिनीपासून थोड्या उंचीवर ठेवा. गवतातून चलताना पायात बुट असावेत. अंधारातून जाताना नेहमी विजेरी, बॅटरी सोबत ठेवा. जमिनीवर झोपू नका. साप निशाचर असल्याने त्यांचा वावर रात्री जास्त असतो. जमिनीवर झोपताना अंथरुण भिंतीलगत टाकू नका. तसेच झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. जेणेकरुन मच्छर आणि साप यांचा दंश होणार नाही.

जर आपण आणि साप समोरासमोर आलो तर घाबरुन न जाता स्तब्ध उभे राहा. त्याचे लक्ष विचलीत करण्यासाठी जवळची एखादी वस्तू बाजुला फेकल्यास त्या वस्तुकडे सापाचे लक्ष केंद्रित होताच तुम्ही बाजूला जा. साप घरात आल्यास घाबरु नका, शांत राहा. त्याला न मारता जाणकार सर्पमित्राला बोलवा. सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबून त्यावर लक्ष ठेवा. लहान मुले, पाळीव प्राण्यांना त्यापासून लांब ठेवा. सापाजवळ जाणे, फोटो काढणे, असे करु नये. नाग, मण्यार, घोणस, फुरसे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख ४ विषारी साप आहेत. यांचा दंश प्राणघातक असतो, अशा सापांपासून सावध राहावे. अनुभवी जाणकार सर्पमित्राला संपर्क करावा किंवा मानद वन्यजीव संरक्षक, स्थानिक वन विभागाला संपर्क करावा.

पावसाळ्यात मानवीवस्तीमध्ये साप आढळून सर्पदंशांचे प्रकार वाढतात. खबरदारीच्या उपाययोजना करुन स्वतःला सुरक्षित ठेवा. साप आढळल्यास मानद वन्यजीव संरक्षक, स्थानिक वन विभाग, सर्पमित्रांना बोलवा. साप पकडण्यासाठी पैशाची मागणी केल्यास वन विभागाकडे तक्रार करा.

वन विभाग (हेल्पलाईन) १९२६

सर्पमित्र (कल्याण पश्चिम विभाग):
दत्ता बोंबे ९२२०४६८९९१ / ७०२१८५२९७६.
सुहास पवार   ८८५०५८५८५४ / ७२०८३४९३०१.
हितेश करंजकर ९८१९४१६०६३.

वॉर फाऊंडेशन संस्था, कल्याण ९८६९३४३५३५ /८३८३०५७७७७.

कल्याण पूर्वः
मुरलीधर जाधव (मुंबई पोलीस) ९८७००४८१४३.
पियूष पालव ९३२१५७२३८७.
पलावा सिटी, विशाल कथरिया ९९३०३९०९६०.
कुलदीप चिकनकर ९९२०९९८४५७.

डोंबिवली पूर्वः
मनीष पिंपळे ९९८७३२६२७३.
निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली ८७७९६०२८३६/८०८२२९४००८.

डोंबिवली पश्चिमः
निहार सकपाळ ९१३६०४८८६७.
भावेश बने ९८३३७०१०५७.

सेवा ट्रस्ट हेल्पलाईन ८२९१००४६१६/९८९२४४४३०५.

टिटवाळा विभागः
निखिल कांबळे ९७६८१६१९२९.
सुमित भडांगे ९८३३८६२८४०.

हेल्पींग हॅण्ड संस्था,प्रवीण महाजन (टिटवाळा/वरप/कांबा/मुरबाड) ७२१८१६३२३६. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाका; शासनाचे महापालिकांना आदेश