नवी मुंबईत ८५० पोलींग बुथवर शांततेत मतदान

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानावेळी २ ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याच्या घटना वगळता नवी मुंबईत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. नवी मुंबई पोलिसांनी सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्याने ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघातील सर्वच बुथवर शांततेत मतदान झाले. ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वतः काही मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्था आणि मतदान यंत्रणेची माहिती घेतली.  

नवी मुंबई शहरामध्ये ‘ठाणे लोकसभा मतदारसंघ'मधील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघ येत असून या दोन्ही मतदारसंघातील सुमारे ८५० पोलींग बुथवर २० मे रोजी शांततेत मतदान पार पडले. मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी ४ हजार पोलीस कर्मचारी-अधिकारी, ८०० होमगार्ड तसेच केरळ आणि कर्नाटक येथील एसआरपीएफ, आरपीएफच्या ६ कंपन्यांच्या माध्यमातून शहरात सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.  

विशेष म्हणजे नवी मुंबई पोलिसांनी द्रोण कॅमेऱ्याद्वारे मतदान केंद्रावर वॉच ठेवला होता. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ज्या ठिकाणी जास्त बुथ आहेत, तसेच झोपडपट्टी सारख्या भागात जास्त गर्दी आहे, अशा ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्था आणि मतदान यंत्रणेची माहिती घेतली. यावेळी ईव्हीएम मशीन बंद होण्याच्या २ किरकोळ घटना वगळता नवी मुंबई मध्ये कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कुठलीही घटना घडली नाही.  

तुर्भे, बेलापूर मध्ये ईव्हीएम मशीन बंद...  

तुर्भे येथील नवजीवन हायस्कुल आणि बेलापूर येथील विद्याप्रसारक हायस्कुल या २ ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्याने काही काळ या दोन्ही मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, या दोन्ही ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्यानंतर तेथे मतदान सुरळीत सुरु झाले.  

मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे, यासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मागील दोन रात्रीपासून पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. पेट्रोलींग, नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलिसांकडून गैरकृत्य करणाऱ्यांवर वॉच ठेवण्यात आला आहे. निवडक आयोगाच्या सी व्हिजील ॲपवर तसेच २४ तास सुरु असलेल्या कंट्रोल रुमवर येणाऱ्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. कुठेही पैसे वाटप, दारु अथवा अंमली पदार्थाच्या वाटपाचे प्रकार घडलेले नाहीत. इव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार वगळता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कुठलाही प्रकार घडला नाही.

-मिलिंद भारंबे, पोलीस आयुवत-नवी मुंबई. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ४५ वर्ष मतदान केले अन्‌ यंदा मतदान यादीतून नाव गायब