लोकसभा निवडणुकीसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज

नवी मुंबई : ‘ठाणे लोकसभा मतदार संघ'साठी येत्या २० मे रोजी मतदान होणार असून नवी मुंबई मधील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदार संघमध्ये मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांनी  निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे आणि मावळ या २ लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो. १३ मे रोजी चौथ्या टप्प्यामध्ये ‘मावळ लोकसभा मतदारसंघ'ची निवडणूक शांततेत पार पडली. आता ‘ठाणे लोकसभा मतदार संघ'साठी पाचव्या टप्प्यामध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत पोलिसांचा बंदोबस्त वाढवून शहरातील मुख्य रस्त्यावर आणि चौकात पेट्रोलिंग, तपासणी मोहीम, अंमली पदार्थ शोध मोहीम आणि कारवाई, शस्त्र जप्ती, कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबवून शेकडो लोकांची धरपडक केली आहे.  

त्याशिवाय शहरात अशांतता निर्माण करणारे गुंड, सराईत गुन्हेगार यांच्यावर सुध्दा कारवाई करुन त्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फिरते निगराणी पथक आणि स्थिर देखरेख पथकाने मागील दीड महिन्यांमध्ये बेकायदेशीररित्या वाहनातून नेली जाणारी २.२२ कोटी रुपयांची रोकड देखील जप्त केली आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ‘मावळ लोकसभा मतदारसंघ'मध्ये कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार न होता, शांततेत मतदान पार पडले.  

आता ‘ठाणे लोकसभा मतदारसंघ'च्या बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदार संघमध्ये मतदानाच्या दिवशी २० मे रोजी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. त्यासाठी १४४ वरिष्ठ अधिकारी, १७४१ पोलीस अंमलदार, ८१९ होमागार्ड त्याचप्रमाणे इतर राज्यातील सीएपीएफ आणि एसआरपीएफ यांच्या ६ कंपन्यांचे ६०० जवान, ७ पाहणी पथक (फिरते), ७ स्थिर पाहणी पथक असा सुमारे ३५०० पेक्षा अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  

येत्या २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, नागरिकांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे, यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडावे, नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा. नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

-मिलिंद भारंबे, पोलीस आयुवत-नवी मुंबई. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अनधिकृत होर्डिग्जवर होत असलेल्या कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची काँग्रेसची मागणी