ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे ८ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट

अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला होर्डिंगच्या स्थितीचा आढावा

ठाणे : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे ८ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करुन स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेला सादर करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तत्काळ सर्वेक्षण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी १५ मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर बैठकीस उपायुक्त (जाहिरात विभाग) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, जाहिरात कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान-मोठे असे २९४ स्ट्रक्चर (सांगाडे) आहेत. या सर्व स्ट्रक्चरचे नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. मात्र, आता त्यांच्या मालकांनी-कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने, ८ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करुन स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेला सादर करायचे आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांना नोटीसाही देण्यात आल्या आहेत. स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ज्या होर्डिंगचे आकारमान मंजूर मोजमापापेक्षा जास्त आहे, त्यात ८ दिवसात सुधारणा न झाल्यास वाढीव काम महापालिका काढून टाकणार आहे. त्याबद्दल संबंधित कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचेही रोडे यांनी सदर बैठकीत सांगितले.

राज्य शासनाने निर्धारित केलेल्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर फलक लावण्यात आले असल्यास ती उंचीही कमी करण्यात येणार आहे. उंची वाढवण्यात आलेल्या, धोकादायक होर्डिंगचे सर्वेक्षण ‘जाहिरात विभाग'तर्फे करण्यात येणार आहे. त्याचवेळी महापालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग असल्यास त्याचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात ‘मध्य रेल्वे'च्या हद्दीत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारित काही होर्डिंग आहेत. त्यांचेही ८ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करुन स्टॅबिलिटी सर्टिफिकेटची प्रत (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करण्यासंदर्भात दोन्ही यंत्रणांना कळविण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा ‘काँग्रेस'चा घाट