पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाऊले हुकूमशाहीकडे -शरद पवार

कल्याण : गांधी घराण्याचे देशासाठी मोठे योगदान होते. त्यांनी देशासाठी केलेला त्याग विसरुन चालणार नाही. राजीव गांधी यांची हत्या झाली, इंदिरा गांधी यांची हत्या झाली, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र, राहुल गांधी यांच्या देशभरात निघालेल्या ‘पदयात्रा'वर टिंगल-टवाळी करण्याचे काम मोदी करीत आहेत. भारताच्या सिमेवरील अरुणाचल प्रदेशातील १३० किलोमीटर भूभाग चीनने गिळंकृत करुन चीनच्या सैनिकांसाठी घरे उभारली आहेत, रस्ते तयार केले आहेत. असे असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र चीनच्या घुसखोरीकडे ढुंकूनही पाहत नाही, अशी खरमरीत टीका ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार'चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कल्याण येथे केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाऊले हुकूमशाहीकडे जाणारी असल्याचा घणाघात करत आपल्या सर्वांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव करणे आवश्यक असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

‘भिवंडी लोकसभा मतदार संघ'मधील ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम मधीील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर १२ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना शरद पवार बोलत होते. याप्रसंगी ‘राष्ट्रवादी'चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गट'चे नेते खासदार संजय राऊत, निर्भय बनो-विधितज्ञ ॲड. असीम सरोदे, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार सुरेश म्हात्रे आदिंसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या देशातील नेत्यांना तुरुंगात डांबले जाते. मग, ते राज्याचे मुख्यमंत्री असोत गृहमंत्री असोत अथवा पत्रकार असोत. त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने तुरुंगात टाकले जात असल्याने देश हुकूमशाहीच्या मार्गाने जात आहे. देशातील मुख्य नागरी समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असून महागाई बेरोजगारी, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्याच्या कष्ट, मेहनतीकडे  दुर्लक्ष केल जात आहे  शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत दिली जात नाही. कष्टकऱ्याचे धान्य फुकट वाटप करीत आहेत, असा आरोप शरद पवार यांनी यावेळी बोलताना केला.

जगाला भारताच्या निवडणुकीची आस्था असून जगात जिथे जिथे लोकशाही आहे, तिथे भारताच्या लोकशाहीची आस्था असून भारताची संसदीय लोकशाही टिकली पाहिजे. २०२४-ची निवडणूक ‘भाजपा'च्या हुकूमशाही विरुध्द लोकशाही अशा स्वरुपाची असल्याचे शरदर पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण लोकशाहीच्या बाजूने उभे राहायचे असून एका ‘विस्कटलेल्या लोकशाही'चा चेहरा नरेंद्र मोदी यांनी आणि अमित शहा यांनी जो आपल्यासमोर १० वर्षात मांडलेला आहे, तो अत्यंत भयानक आणि ‘संविधान'ची संपूर्ण मोडतोड करणारे असल्याचे पवार म्हणाले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 उरण तालुक्यातील मतदान केंद्रावर शांततेत मतदान