पाणी निचरा होणाऱ्या खाड्या रुतल्या गाळात

उरण : उरण तालुक्यातील चिरनेर, विंधणे, चिर्ले, वेश्वी, पागोटे, भेंडखळ परिसरातील पाणी निचरा होणाऱ्या खाड्या या वर्षानुवर्षे गाळ आणि कचरा यामुळे गाळात रुतल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील गावांना यावर्षी पुराचा तडाखा बसण्याची भिती व्यवत केली जात आहे. यासाठी शासनाने खाडी पात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

पावसाचे पाणी नाल्यावाटे खाडीपात्रात वाहून जाते. या पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात गाळ, कचराही वाहून जात आहे. वर्षानुवर्षे वाहून गेलेल्या गाळाणे आणि कचऱ्याने खाड्या भरुन गेल्या आहेत. त्यात खाडी पात्रात खारफुटी आणि झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा लवकर होताना दिसत नाही. तसेच खाडीकिनाऱ्यावर वाढत्या अतिक्रमणामुळे पावसाळ्यात गाव परिसरात पूरस्थिती निर्माण होत आहे. यावर्षी खाडी पात्रातील गाळ काढण्याचे काम शासनाने हाती घेतलेले नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शवयता वर्तविण्यात आली आहे.

वर्षानुवर्षे पावसाच्या पाण्यावाटे गाळ आणि कचरा जाऊन खाडी पात्र गाळाने भरले आहे. पूर्वी शेतीसाठी यातील गाळ काढला जात होता. मात्र, आता खाडीचे पात्रच शिल्लक राहिलेले दिसत नाही. खाडी पात्रातील गाळ जर काढला नाही तर पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होणार नाही. एकंदरीतच गाव परिसरात परिस्थिती जैसे थे राहणार आहे. त्यामुळे शासनाने, आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घ्यावा. -मधुकर गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते.

गाळाने जर खाडी पात्र भरले असेल तर कोणत्या योजनेतून ते गाळ काढण्याचे काम करता येईल का? ते पाहून त्यावर उपाययोजना केली जाईल. -उध्दव कदम, तहसीलदार-उरण. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई